तरुणीच्या आत्महत्येचा आरोप असेलेले व लपून बसेलले राज्य सरकारमधील एक मंत्री आज १५ दिवसानंतर वाजतगाजत प्रकट झाले. विविध प्रसिद्धी माध्यमांमधून त्या मंत्र्याच्या समर्थकांचा जल्लोष व गाड्यांची मिरवणूक राज्यातील जनतेने पाहिली. विशेष म्हणजे आज एका वृत वाहिनीवर त्या मंत्र्यांचे आत्महत्या केलेल्या तरुणी सोबतचे फोटोही प्रसिद्ध झाले आहेत, मग अद्यापही या मंत्र्यांविरुध्द ठाकरे सरकारने कारवाई का केली नाही असा प्रश्न भाजापाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी उपस्थित केला आहे. पूजा चव्हाण कथित आत्महत्या प्रकरणावरुन गेल्या काही दिवसांपासून विरोधकांच्या निशाण्यावर असणारे राज्याचे वनमंत्री संजय राठोड हे आज पोहरादेवीत दर्शनासाठी पोहोचले होते. राठोड यांच्या पत्रकार परिषदेनंतर नाव न घेताच चंद्रकांत पाटील यांनी राठोड यांच्यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
त्या मंत्र्यांच्या विरोधात एवढे पुरावे समोर येऊनही अजून काय सिद्ध होणे बाकी आहे? राज्य सरकार अजूनही ढिम्मपणे बघ्याची भूमिका का घेत आहे? राज्य सरकार त्या प्रकरणावर कोणताही गुन्हा नोंदवून घेण्यास का तयार नाही आहे?, असे प्रश्नही पाटील यांनी उपस्थित केले आहेत. सत्तेचा गैरवापर करून कायदा खिशात घालण्याची परिसीमा या ठाकरे सरकारने ओलांडली असल्याची टीका करताना पाटील यांनी, ‘या सर्व घडामोडी महाराष्ट्राच्या जनतेसमोर सुरु असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शरद पवार गप्प का आहेत?’, असा प्रश्नही उपस्थित केला.
महाराष्ट्राच्या अस्मितेचे संरक्षण उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याकडून अपेक्षित असताना ते त्यांच्याच मंत्रीमंडळातील एका आरोपीला वाचवत असल्याचा आरोप करतानाच पाटील यांनी जोपर्यंत त्या तरुणीच्या कुटुंबियांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नाही, अशी भूमिका जाहीर केली. तसेच गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 23, 2021 5:54 pm