विठ्ठल माझी माय । आम्हा सुखा उणे काय ।
घेतो अमृताची धनी । प्रेम वोसंडले स्तनी ।
क्रीडो वैष्णवांच्या मेळी । करू आनंदाच्या जळी ।
तुका म्हणे कृपावंत । ठेवी आम्हांपाशी चित्त ।
पुणे जिल्ह्य़ातील शेवटचा मुक्काम उरकून जगद्गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने रविवारी सकाळी सराटीकरांचा निरोप घेऊन सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश केला.
तत्पूर्वी पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्यात आले. या वर्षी नीरा नदीत पाणी सोडण्यात आल्याने वैष्णवांनीही नीरा स्नानाचा आनंद घेतला. हरिनामाचा गजर, तुकोबांचे अभंग आणि ज्ञानोबा-माउली तुकारामाचा जयघोष टाळ-चिपळ्यांचा निनाद आणि मृदुंगाचे हृदयस्पर्शी बोल, सकाळच्या प्रसन्न वातावरणात नीरा नदीवरून वाहणाऱ्या वाऱ्याची हलकीशी झुळूक आणि आसमंतात टाळ मृदुंगाच्या ठेक्यावर फडकणाऱ्या पताका अशा भक्तिमय वातावरणात नीरा नदीवरील पूल ओलांडून पालखी सोहळ्याने तीर्थ विठ्ठल.. क्षेत्र विठ्ठल असलेल्या सोलापूर जिल्ह्य़ात प्रवेश केला.
सोलापूर जिल्ह्य़ाचे पालकमंत्री दिलीप सोपल, उच्च शिक्षण मंत्री राजेश टोपे, माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, माळशिरस तालुक्याचे आमदार हनुमंत डोळस, जिल्हाधिकारी व विविध खात्याचे अधिकारी व संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी पालखी सोहळ्याचे सोलापूर जिल्ह्य़ाच्या प्रवेशद्वारावर जंगी स्वागत केले. त्यानंतर सोहळ्याने अकलूज शहरात प्रवेश केला. यावेळी चौकाचौकात विविध संस्थांच्या वतीने पालखी सोहळ्याचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर सोहळा पालखी मार्गावरील तिसऱ्या गोल रिंगणासाठी माने विद्यालयाच्या भव्य प्रांगणात दाखल झाला. यावेळी परिसरातील भाविकांनी मोठी गर्दी केली होती. भागवत धर्माचे प्रतीक असलेल्या वैष्णवांच्या खांद्यावर फडकणाऱ्या पताकांनीही वैष्णवांबरोबर रिंगण पूर्ण करताना पकडलेला तुफान वेग, या वेगाने पताकांना आलेली गती भाविकांनी ब्रह्मानंदी आनंद घेऊन अनुभवली, डोई वृंदावन घेतलेल्या वैष्णव भगिनींनीही भक्तिभावाने रिंगण पूर्ण केले. वृंदावनातील डोलणाऱ्या तुळशींनी घेतलेल्या गतीने पुन्हा एक सुखावह लहर उमटली.
विणेकरी आणि मृदुंगाचार्याच्या रिंगणांनी साक्षात विठुराया अकलूजमध्ये अवतरल्याची भाविकांना अनुभूती होत असतानाच वायुवेगाने देवाच्या आणि मोहिते पाटलांच्या अश्वाने वायुवेगाने रिंगण पूर्ण करताच पुन्हा हरिनामाचा गजर सुरू झाला आणि भाविकांचे हात घोडय़ाच्या टापाखालील माती कपाळी लावण्यासाठी जमिनीला टेकले. अशा चिंब भक्तिरसात अकलूज येथे तुकोबांच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण पार पडले.
तद्नंतर पालखी सोहळा अकलूजमध्ये विश्रांतीसाठी विसावला. अकलूजच्या श्री विठ्ठल मंदिरात पालखीचा आज दिवसभर विश्रांतीसह सायंकाळचा मुक्काम आहे. आज दिवसभर अकलूजकर वैष्णवांच्या सेवेत दंग होते. चहापान, फराळ, भोजन अशी व्यवस्था अकलूज येथील विविध संस्था  व मंडळांनी केली होती. उद्या पालखी सोहळ्याचे माळीनगरला उभे रिंगण असून बोरगावला मुक्काम आहे.