महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या बारावीच्या फेरपरीक्षेचा निकाल शुक्रवारी ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला. फेरपरीक्षेत यंदा केवळ २३.१७ टक्के, म्हणजेच ३० हजार ४३८ विद्याार्थी उत्तीर्ण झाले आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फेरपरीक्षेचा निकाल जेमतेम अर्धा टक्काच वाढला आहे. राज्य मंडळाच्या प्रभारी अध्यक्ष डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली.

मार्चमध्ये झालेल्या परीक्षेतील अनुत्तीर्ण विद्याार्थी आणि श्रेणी सुधारण्यासाठी इच्छुक असलेल्या राज्यभरातील विद्यार्थ्यांनी जुलै-ऑगस्टमध्ये फेरपरीक्षा दिली. १७ जुलै ते ३ ऑगस्ट दरम्यान ही परीक्षा झाली. फेरपरीक्षेसाठी १ लाख ३१ हजार ६०३ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केले होते. प्रत्यक्ष परीक्षा दिलेल्या १ लाख ३१ हजार ३५५ विद्यार्थ्यांपैकी केवळ ३० हजार ४३८ विद्यार्थीच उत्तीर्ण होऊ शकले. २०१८ आणि २०१७ मध्ये झालेल्या फेरपरीक्षेच्या निकालाची टक्केवारी अनुक्रमे २२.६५ टक्के आणि २४.९६ टक्के होती.

फेरपरीक्षेत लातूर विभागाचा निकाल सर्वाधिक ३३.८९ टक्के आणि मुंबई विभागाचा निकाल सर्वांत कमी १९.१२ टक्के लागला. या परीक्षेतील उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता पुढील अभ्यासक्रमासाठीच्या प्रवेश प्रक्रियेमध्ये सहभागी होता येईल.

महत्त्वाच्या तारखा –

  • गुणपडताळणीसाठी – २६ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर (अर्जासोबत निकालाची छायाप्रत जोडणे अनिवार्य)
  • छायाप्रतीसाठी – २६ ऑगस्ट ते १४ सप्टेंबर (अर्जासोबत निकालाची छायाप्रत जोडणे अनिवार्य)
  • पुनर्मूल्यांकनासाठी – उत्तरपत्रिकेची छायाप्रत आवश्यक (छायाप्रत मिळाल्यानंतर पुढील पाच दिवस)