माझगाव येथील जीएसटी भवनाला दोन दिवसांपूर्वी लागलेल्या भीषण आगीत शिपाई कुणाल जाधव यांनी प्रसंगावधान राखत राष्ट्रध्वज सुरक्षित उतरवला. शिपाई कुणाल जाधव यांनी दाखवलेल्या या शौर्याचं सर्वच स्तरावर कौतुक होतं आहे. कुणाल जाधव यांच्या देशप्रेमाची दखल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली असून त्यांचा छोटेखानी सत्कारही केला आहे. सत्कारावेळी सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणही उपस्थित होते. सह्यादी अतिथीगृहात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांनी कुणाल जाधव यांचा सत्कार केला.

सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी शिपाई कुणाल जाधव यांच्या देशप्रेमाची बातमी वाचल्यानंतर ट्विटरवरून कौतुक केलं होतं. बुधवारी मुंबईत परतल्यानंतर अशोक चव्हाण यांनी कुणाल जाधव यांना सह्याद्री अतिथीगृहात बोलावून घेतले. मंत्रीमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशीही जाधव यांचा परिचय करून दिला. त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांनी कुणाल जाधव यांना शाल, श्रीफळ आणि शिवाजी महाराजांची प्रतीमा देऊन सन्मानीत केले. याप्रसंगी जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड, सुनिल केदार आदी मंत्रीही उपस्थित होते.

 

कुणाल जाधव यांचं देशप्रेम –
सोमवारी दुपारी एक वाजण्याच्या दरम्यान मुंबईतील माझगाव येथे असलेल्या जीएसटी भवनाला भीषण आग लागली. सातव्या आणि आठव्या मजल्यावर ही आग लागली. आगीचे लोळ हळूहळू नवव्या मजल्यावर असलेल्या तिरंग्यापर्यंत पोहचू लागले होते. त्याचवेळी प्रसंगावधान राखत शिपाई कुणाल जाधव यांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून तिरंगा सन्मानपूर्वक खाली उतरवला. आगीतून राष्ट्रध्वज वाचवण्यासाठी कुणाल जाधव यांनी जीवाची बाजी लावत पेटत्या इमारतीचे ९ मजले पळत-पळत चढून गेले व तिरंगा सुखरूप खाली आणला. त्यांच्या या देशप्रेमाचं आणि शौर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. सोशल मीडियावर त्यांना सॅल्युट केला जातोय.