भाजपाचे जेष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला असून ते लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी खडसेंनी भाजपा सोडू नये अशी इच्छा व्यक्त केली आहे. त्यासाठी “ओ जानेवाले, हो सके तो लौट के आना” अशा शब्दात त्यांना भावनात्मक साद घातली.

मुनगंटीवार म्हणाले, “खडसेंचा पक्षांतर्गत सुरु असलेला वाद संपेल असं मला वाटायचं, पण जे होतंय ते दुःखदायक आहे. खडसेंनी भाजपा सोडणं धक्कादायक आहे. त्यांनी जाऊ नये असं आम्हाला मनापासून वाटतं. खडसेंचा राजीनामा ही आमच्यासाठी निश्चितचं चिंतनाची बाब आहे. पण आता त्यांनी निर्णय घेतला आहे तर “खुश रहे तुम सदा ये दुवा है मेरी” हेच आम्ही म्हणू शकतो.”

आणखी वाचा- ठरलं! एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार

महाराष्ट्र भाजपाला उत्तर महाराष्ट्रात मोठा हादरा बसला आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही घोषणा केली. मागील काही महिन्यांपासून पक्षावर नाराज असलेले एकनाथ खडसे शुक्रवारी राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

आणखी वाचा- भाजपाचे १० ते १२ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर; जयंत पाटील यांचा गौप्यस्फोट

गेल्या काही दिवसांपासून एकनाथ खडसे लवकरच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दाखल होणार असल्याच्या चर्चेनं वेग घेतला होता. अखेर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाबद्दलची माहिती दिली.