नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्हय़ातील हिवतापाचा प्रकोप नियंत्रणात आणण्यासाठी राज्य शासनाचा सार्वजनिक आरोग्य विभाग, सर्च फाऊंडेशन, नॅशनल इन्स्टिटय़ूट फॉर रिसर्च इन ट्रायबल हेल्थ, जबलपूर आणि टाटा ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने समाज सेवक व सर्च फाऊंडेशनचे संस्थापक महाराष्ट्र भूषण डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली कार्य गट (टास्क फोर्स) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

जिल्हय़ात हिवताप नियंत्रणासाठी डॉ. अभय बंग यांच्या अध्यक्षतेखाली सदस्य व सदस्य सचिवांचे कार्य गट स्थापन करण्याला राज्य शासनाने मंजुरी दिली आहे. शासनाच्या या मंजुरीनुसार एकूण नऊ सदस्यीय कार्य गटाच्या अध्यक्षपदी डॉ. अभय बंग यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सहअध्यक्ष आरोग्य सेवा संचालनालय, मुंबईचे संचालक आहेत. सदस्यांमध्ये माजी आरोग्य महासंचालक डॉ. सुभाष साळुंखे, राष्ट्रीय आदिवासी आरोग्य संस्था, जबलपूरचे संचालक, टाटा ट्रस्ट, टाटा रुग्णालय, परळ, मुंबईचे प्रतिनिधी, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, नवी दिल्लीचे तज्ञ प्रतिनिधी, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, पुणेचे कीटकशास्त्रज्ञ, राष्ट्रीय आरोग्य अभियान, महाराष्ट्राचे आयुक्त संचालक यांचे प्रतिनिधी व पुण्याच्या आरोग्य सेवा सहसंचालकांचा  समावेश आहे.

हिवताप नियंत्रण कार्य गटाच्या कार्य व उद्दिष्टांमध्ये जिल्ह्य़ातील हिवताप परिस्थितीचा अभ्यास करणे, हिवताप परिस्थितीचे विश्लेषण करून वाढीची कारणे व करावयाच्या प्रतिबंधात्मक व नियंत्रणात्मक उपाययोजना करणे, कीटकनाशकांची फवारणी, मच्छरदाणी, आवश्यक मनुष्यबळ या बाबींचे सुयोग्य व्यवस्थापन करणे, स्थानिक भाषेतून प्रभावी आरोग्य शिक्षण देण्यासाठी कृती योजना आखणे, औषधांच्या तसेच कीटकनाशकांच्या प्रतिरोधाचा अभ्यास करणे, शेजारील राज्यातील हिवताप परिस्थितीचा तुलनात्मक अभ्यास करून त्या अनुषंगाने आंतरराज्य सभेचे आयोजन करणे, गडचिरोली जिल्हय़ातील हिवताप रुग्णांचे प्रमाण  तीन वर्षांमध्ये कमीत कमी राहील यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करणे आदी बाबींचा समावेश आहे.

कार्य गटाच्या सदस्य सचिवांनी अध्यक्षांच्या सूचनेनुसार कार्य गटाच्या अन्य सदस्यांशी संपर्क साधून बैठकांचे आयोजन करणे तसेच प्रथम अहवाल कार्य गट स्थापन झाल्यावर तीन महिन्यांच्या आत सादर करावयाचा आहे. गडचिरोलीत दरवर्षी हिवतापाने असंख्य आदिवासी मृत्युमुखी पडतात. या नक्षलग्रस्त आदिवासी जिल्हय़ातील अतिदुर्गम भागात आरोग्य सेवा अजूनही पोहोचलेली नाही.