मुंबईहून रेल्वे गाडय़ांनी येणाऱ्या चाकरमानींची कोकणातील रेल्वे स्थानकांवर उतरल्यानंतर आरोग्य तपासणी केली जाणार असून आजारी नसल्याचे हमीपत्र घेतले जाणार आहे. मात्र गावी गेल्यावर त्यांच्या विलगीकरणाबाबत गोंधळाचीच परिस्थिती आहे.

रत्नागिरी जिल्हा प्रशासनातर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार या रेल्वे गाडय़ांमधून येणाऱ्या चाकरमानींची नोंदणी आणि आरोग्य तपासणीसाठी रेल्वे स्थानकांवर आजपासून (१५ ऑगस्ट) खास  पथके नियुक्त केली आहेत. त्याचबरोबर रेल्वे पोलीस दलाचेही सहाय्य घेण्यात येणार आहे. रत्नागिरी रेल्वे स्थानकात उतरणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रिनिंगद्वारे तर ५० वर्षांवरील व्यक्तीची अँटीजेन तपासणी केली जाणार आहे. येणाऱ्या प्रत्येकाचे नाव, पत्ता, संपर्क क्रमांक घेतला जाणार असून ‘मला कोणताही आजार नाही’ अशा हमीपत्रावर सही घेण्यात येणार आहे.

मात्र, यापूर्वी राज्य शासनाने गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमानींना दहा दिवस विलगीकरण  बंधनकारक केले आहे. तसेच, १२ ऑगस्टनंतर येणाऱ्या प्रवासी किंवा चाकरमानींना करोनाची बाधा नसल्याचा चाचणी अहवाल अनिवार्य केला आहे. उद्यापासून रेल्वेने येणाऱ्या चाकरमानींसाठी मात्र या संदर्भात कोणत्याही स्पष्ट सूचना शुक्रवारी सायंकाळी उशीरापर्यंत आलेल्या नव्हत्या. त्यामुळे गावांमध्ये गोंधळ आणि प्रसंगी वादावादी होण्याचा धोका आहे.

अशा प्रकारे अचानक गाडय़ा सोडण्याच्या निर्णयाबाबत सार्वत्रिक नाराजी आहे.

दरम्यान, १५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत मध्य रेल्वेच्या १६२ गाडय़ा कोकण रेल्वे मार्गावर धावणार आहेत. या गाडय़ांपैकी लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते रत्नागिरी १५ ते २२ ऑगस्ट ८ फेऱ्या आणि १६ ते २३ ऑगस्ट ८ फेऱ्या, मुंबई सीएसएमटी ते सावंतवाडी रोड प्रत्येकी १६ फेऱ्या, सीएसएमटी ते सावंतवाडी रोड सोळा फेऱ्या, लोकमान्य टिळकक टर्मिनन्स ते कुडाळ १५ ते २३ ऑगस्ट १६ फेऱ्या, लोकमान्य टिळक टर्मिनन्स ते सावंतवाडी रोड २४ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २६ फेऱ्या, सीएसएमटी ते सावंतवाडी रोड २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर २४ फेऱ्या, लोकमान्य टिळक ते रत्नागिरी २५ ऑगस्ट ते ५ सप्टेंबर या कालावधीत धावणार आहेत.पहिली गाडी १५ ऑगस्टला सकाळी ४.३० वाजता चाकरमान्यांना घेऊन रत्नागिरी स्थानकात दाखल होणार आहे.