राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी करोना चाचणीसाठी सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित झाल्याची धक्कादायक माहिती दिल्याने खळबळ माजली आहे. करोना संसर्गाची तपासणी करण्यात येणाऱ्या आरटी पीसीआरच्या १२ लाख ५० हजार किट्स सदोष आढळल्या असल्याचं राजेश टोपे यांनी जालना येथे बोलताना सांगितलं होतं. दरम्यान त्यांच्या वक्तव्यावर वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ते जालन्यात बोलत होते. राजेश टोपे यांनी खोलवर माहिती न घेता हे वक्तव्य केल्याचं दिसत आहे असं अमित देशमुख यांनी म्हटलं आहे.

“टेस्ट किट्सचा पुरवठा करण्यासाठी ते पुढे आले होते. ज्या बाबी समोर आल्या आहेत त्याची सखोल चौकशी होत आहे. चौकशीअंती जे समोर येईल त्यानुसार कारवाई करण्यात येईल,” असं अमित देशमुख यांनी सांगितलं. राजेश टोपेंच्या विधानासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “राजेश टोपे जे बोलले ते मी ऐकलं नाही, पण कानावर जे आलं त्यावरुन खोलवर माहिती न घेता हे राजेश टोपे यांनी वक्तव्य केलं असं वाटतं आहे. मी त्यांच्याशी चर्चा करेन आणि समज, गैरसमज दूर करेन”.

आणखी वाचा- राज्यात करोनाच्या चाचणीसाठी १२ लाख सदोष आरटी पीसीआर किट्स वितरित; राजेश टोपेंच्या कबुलीने खळबळ

राजेश टोपे यांनी काय म्हटलं –
“राज्य सरकारने खरेदी केलेल्या GCC Biotech Ltd कंपनीच्या किट्स सदोष असल्याचा रिपोर्ट एनआयव्हीने दिला,” असल्याचं राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. “वैद्यकीय संचालनालयाकडून किट्सची खरेदी करण्यात येत असून GCC Biotech ltd या कंपनीच्या किट्सचा वापर तातडीने थांबवण्यात आला आहे. तसंच सदोष किट्सचा पुरवठा करणाऱ्या या कंपनीवर कारवाई करणार,” असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. “जिथे किट्सचं वाटप झालं आहे तेथील निकाल चुकीचे येण्यापेक्षा ते थांबवून तात्पुरतं एनआयव्हीने त्यांच्या किट्स उपलब्ध करुन द्यायचा असा निर्णय झाला आहे. जेणेकरुन टेस्टिंग थांबू नये. एनआयव्हीकडून सगळ्या टेस्ट केल्या जातील,” अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.