राज्यात भाजपा सरकारकडून समृद्धी महामार्ग करण्यात येत असून या महामार्गाच्या भूसंपादनात एका व्यक्तीला ८०० कोटी रुपये मिळाले, असा गौप्यस्फोट विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात केला. त्या व्यक्तीचे नाव माहीत असले तरी आताच ते जाहीर करणार नाही. या सर्वांच्या मागे कोण आहे, असा सवालही त्यांनी विचारला.

राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. आघाडी सरकारच्या काळात सिंचन प्रकल्पात हजारो कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आला. मात्र या आरोपांचे पुढे काय झाले?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. राज्यात भाजपाची सत्ता येऊन चार वर्षांचा कालावधी झाला. त्यांनी सिंचन प्रकल्पावर किती काम केले, याची श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी देखील त्यांनी केली. तसेच शेतकऱ्यांना कर्जमाफी दिल्याचा दावा सत्ताधाऱ्यांकडून केला जातो. मात्र त्या कर्जमाफीचा शेतकऱ्यांना फायदा झाला नाही. याऊलट राज्य सरकारच्या पीक विमा योजनेचा शेतकऱ्यांऐवजी रिलायन्स कंपनीला हजारो कोटी रुपयांचा फायदा झाला आहे, अशा शब्दात त्यांनी भाजपावर सडकून टीका केली.

आगामी निवडणुकीत काँग्रेस- राष्ट्रवादीची आघाडी होणार की नाही, असा प्रश्न विचारला असता ते म्हणाले,  काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडीबाबत चर्चा करण्यात आली आहे. ही चर्चा लक्षात घेता या दोन्ही पक्षात जागावाटपाविषयी कोणताही तिढा निर्माण होणार नाही. तसेच आघाडीत छोट्या पक्षांना सामावून घेणार असून याबाबत राज्यातील काही पक्षांशी चर्चा देखील करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी एकत्र आल्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी हे एकत्र आल्याची माहिती प्रसारमाध्यमांमधून समजली असून प्रकाश आंबेडकर आघाडीत येण्यासंदर्भात अद्याप चर्चा झालेली नाही. तसेच एमआयएमला सुरुवातीला यश मिळाले. मात्र त्यानंतर झालेल्या निवडणुकामध्ये त्यांना अपयश आले असून एमआयएमचा प्रभाव राज्यात कमी झाला आहे. तसेच एमआयएम हा पक्ष अप्रत्यक्षपणे भाजपाला सहकार्य करत असल्याचा आरोप त्यांनी केला.

काँग्रेसचे आमदार नसीम खान यांच्यावर एका कार्यक्रमादरम्यान पैशांची उधळण केली जात असल्याचा व्हिडिओ दोन दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता. यावरही पाटील यांनी भाष्य केले. नसीम खान यांच्यावर पैशांची उधळण झाली. पण ती योग्य नसून असे प्रकार होता कामा नये. याची प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे, अशी भूमिका त्यांनी मांडली.