औरंगाबादमधील काँग्रेसचे नाराज नेते अब्दुल सत्तार यांनी आज सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. यावेळी गिरीश महाजनही उपस्थित होते. औरंगाबादमधून तिकीट न मिळाल्यानं सत्तार नाराज आहेत. सत्तार औरंगाबादमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास उत्सुक होते. मात्र तिकीट न मिळाल्यानं त्यांनी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा दिला. आपण अपक्ष निवडणूक लढवणार असल्याची घोषणा सत्तार यांनी केली आहे.

अशा परिस्थितीत त्यांनी घेतलेल्या मुख्यमंत्र्यांच्या भेटीमुळे भाजपातील प्रवेशाविषयीच्या चर्चेला उधाण आले आहे. सत्तारांना भाजपकडून काही ऑफर आहे का? भाजप सत्तारांना औरंगाबाद लोकसभेतून अपक्ष उभे करुन विद्यमान खासदार चंद्रकांत खैरेंना मदत करणार का? सत्तार भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार का? असे प्रश्न सर्वांनाच पडले आहेत.  काँग्रेसनं औरंगाबादमधून विधान परिषदेचे सदस्य असलेल्या सुभाष झांबड यांना लोकसभेची उमेदवारी दिल्यानं सत्तार नाराज आहेत. त्यांनी झांबड यांच्याविरोधात निवडणूक लढवणार असल्याचं जाहीर केलं होतं.

मला विश्वासात न घेताच औरंगाबादची उमेदवारी दिल्याचा सत्तारांनी दावा केला आहे. मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरुन शिवसेनेशी फारकत घेत बहुजन जनसुराज्य पक्षाची स्थापना करणारे कन्नडचे आमदार हर्षवर्धन जाधव यांना काँग्रेसने उमेदवारी द्यावी, यासाठी जिल्हाध्यक्ष म्हणून सत्तार यांनी काम सुरू केले होते. त्यांनी जाधव यांच्या घरी जाऊन पक्षात येण्याची विनंती केली होती. असे असतानाही सुभाष झांबड यांच्या नावाची उमेदवार म्हणून घोषणा झाल्याने सत्तार चिडले. शनिवारी सकाळी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याशी त्यांनी संपर्क साधून अपक्ष निवडणूक लढविणार असल्याचे त्यांना कळविल्याचे सत्तार यांनी पत्रकारांना सांगितले. निवडणूक लढण्याबाबत मतदारांची मते जाणून घेण्यासाठी शहरातील आमखास मैदानात एक सभा घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मी लोकसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तसे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना कळविले आहे. काँग्रेसने एकाही अल्पसंख्यांकाला उमेदवारी दिली नाही. मला औरंगाबाद मतदारसंघ निवडून येण्यासाठी योग्य वाटतो आहे. काँग्रेसचा राजीनामा दिला असल्याने आता मला निवडणूक लढविण्याचे व्यक्तिस्वातंत्र्य आहे.      अब्दुल सत्तार</strong>