अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण तपासापेक्षा राजकीय आरोपांमुळेच जास्त चर्चेत आल्याचं चित्र मागील काही दिवसांपासून निर्माण झालं आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्या प्रकरणात बिहारमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर बिहारमधील राजकीय नेत्यांनी मुंबई पोलिसांच्या तपासावर शंका उपस्थित केली होती. त्यापाठोपाठ महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांनीही मुंबई पोलिसांकडून सुरू असलेल्या चौकशीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. भाजपाकडून होत असलेल्या आरोपांना काँग्रेसनं “भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे”, अशा शब्दात समाचार घेतला आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलीस करत असताना या प्रकरणात बिहारमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी अभिनेत्री रिया चक्रवर्ती विरोधात गुन्हा दाखल केला होता. त्यानंतर बिहार पोलिसांनी मुंबई पोलिसांच्या तपासाविषयी आरोप केले. त्यापाठोपाठ राजकीय नेत्यांनीही मुंबई पोलिसांना तपासावरून लक्ष्य केलं. यात महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांनीही लक्ष्य केलं.

महाराष्ट्र भाजपाकडून झालेल्या टीकेला काँग्रेसनं उत्तर दिलं आहे. काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी ट्विट करून भाजपावर निशाणा साधला. “बिहार निवडणूकीसाठी राजकारण करण्याकरिता बिहार पोलिसांचे गुणगान करुन मुंबई पोलिसांना बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या महाराष्ट्र भाजपाच्या नेत्यांचा महाराष्ट्र द्रोह हा उठून दिसत आहे. ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजपा महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे,” असा हल्लाबोल सावंत यांनी केला.

भाजपा नेते नारायण राणे काय म्हणाले होते?

“सुशांत सिंहची आत्महत्या नाही, हत्या आहे. अनेक तज्ज्ञ सांगताहेत, मी सुद्धा तेच म्हणतो. यात कुणालातरी वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे. एफआयआर दाखल झालेला नाही. बिहारमध्ये झाली. १३ तारखेला पार्टी झाली. त्यात सुशांतसोबत कोण होतं. ८ तारखेला पार्टी झाली. दोन तास उशिरा आलेला आणि सुशांतला हॉस्पिटलमध्ये नेणारा माणूस कसा सांगू शकतो, लटकलेलं पाहिलं. दिनो मोरियाच्या घरी दररोज मंत्री येतात. तिथे काय चालतं. सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणातही राज्य सरकार कोणाला तरी वाचवायचा प्रयत्न करत आहे,” असं खासदार नारायण राणे म्हणाले म्हणाले.