हर्षद कशाळकर, अलिबाग

‘बुडत्याचा पाय खोलात’ अशी एक म्हण प्रचलित आहे. रायगड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाची गत काहीशी अशीच झाली आहे. जिल्ह्यात प्रतिकूल परिस्थितीत पक्षाचे अस्तित्व कायम राखणाऱ्या माजी मंत्री रविशेठ पाटील यांनी अखेर काँग्रेसचा पक्षत्याग केला. जिह्यात पक्षाची वाताहत सुरूच असल्याचे यानिमित्ताने पुन्हा एकदा दिसून आले.

राज्यपातळीवर धर्मनिरपेक्ष पक्षांची मोट बांधण्याचे प्रयत्न प्रदेश काँग्रेस कमिटीने सुरू केले आहेत. मतविभाजनाचा फायदा शिवसेना-भाजपला मिळू नये हा यामागचा मूळ उद्देश आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसबरोबरच आता शेतकरी कामगार पक्षाला आघाडीत सामावून घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, हा निर्णय रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कमिटीच्या पचनी पडलेला नाही. याचा प्रत्यय पुन्हा एकदा आला. जनसंघर्ष यात्रेदरम्यान आघाडी करताना स्थानिक परिस्थिती विचारात घ्या, अशी मागणी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे करण्यात आली होती. पक्षहितास बाधा पोहोचेल असा निर्णय घेणार नाही, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली होती. मात्र, यानंतरही स्थानिक नेत्यांमध्ये पुढील भवितव्यावरून संभ्रम कायम राहिला.

उत्तर रायगडात शेतकरी कामगार पक्ष हा काँग्रेसचा पारंपरिक विरोधी पक्ष आहे. दोन्ही पक्षात स्थानिक पातळीवर टोकाचे वाद आहेत. यातून अनेकदा संघर्षांची ठिणगीही पडली आहे. अशा परिस्थितीत शेकापशी जुळवून घेण्याचा निर्णय स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांना पटलेला नाही. गेल्या जिल्हा परिषद निवडणुकीतही अलिबाग आणि पेण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस कमिटीने राष्ट्रवादी, शेकाप आघाडीसोबत जाण्याऐवजी शिवसेनेशी जुळवून घेण्याचा प्रयत्न केला. तर महाड आणि कर्जत परिसरातील काँग्रेस नेते शेकाप आणि राष्ट्रवादीसोबत निवडणुकीला सामोरे गेले. पक्षांतर्गत विरोधामुळे स्थानिक पातळीवर सोयीस्कर आघाडय़ा करण्याचे धोरण यावेळी काँग्रेस पक्षाने स्वीकारले. मात्र, आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत अशी सोयीस्कर आघाडीची भूमिका पक्षनेतृत्वाला घेता येणार नाही. त्यामुळे शेकाप, राष्ट्रवादी आघाडीवरून पक्षात दोन प्रवाह तयार झाले आहेत.

राज्यपातळीवरील नेते शेकापसोबत आघाडीसाठी इच्छुक असले तरी अलिबाग आणि पेण मतदारसंघातील नेत्यांचा शेकापला सोबत घेण्यास ठाम विरोध आहे. कारण दोन्ही मतदारसंघात शेकापची ताकद आहे. त्यामुळे आघाडीच्या जागावाटपात दोन्ही जागांवर शेकाप दावा सांगणार हे निश्चित आहे. अशा परिस्थितीत शेकापशी प्रतिकूल परिस्थितीत दोन हात करून संघटन मजबूत ठेवणारे नेते आणि कार्यकर्त्यांचे राजकीय पुनर्वसन कसे होणार, याची उत्तरे त्यांना सापडताना दिसत नाहीत. त्यामुळे बुडत्या जहाजात प्रवास करण्यापेक्षा संधी मिळेल त्या पक्षात जाण्याचे धोरण काँग्रेस नेत्यांनी आता स्वीकारले आहे. आगामी काळात पक्षाची परिस्थिती अधिकच बिकट होणार आहे.

बॅ. ए. आर. अंतुले यांच्या राजकीय कारकिर्दीत रायगड जिल्ह्यात काँग्रेसला बळ मिळाले. अंतुले यांचा राजकीय अस्त झाला तशी रायगडमधील काँग्रेसला गळती लागली. रामशेठ ठाकूर यांनी शेकापमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर पक्षाला बरे दिवस आले होते. २००४ च्या निवडणुकीत रविशेठ पाटील आणि मधुकर ठाकूर हे दोघे विधानसभेवर निवडून आले होते. ठाकूर पिता-पुत्राने भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर पनवेलमध्ये काँग्रेसचे अस्तित्व कमी झाले. रविशेठ पाटील यांच्यामुळे पेणमध्ये काँग्रेस कमकुवत झाली आहे.

गेल्या विधानसभा निवडणुकीत प्रशांत ठाकूर आणि रामशेठ ठाकूर यांनी साथ सोडल्याने पनवेलमध्ये काँग्रेस पक्षाची पुरती वाताहत झाली होती. अशा परिस्थितीत थोडय़ा प्रमाणात का होईना, अलिबाग, पेण आणि महाड मतदारसंघांत काँग्रेसची पक्षसंघटना तग धरून होती. प्रतिकूल परीस्थितीत महाडमधून माणिक जगताप यांनी, पेणमधून रविशेठ पाटील यांनी आणि अलिबागमधून मधुकर ठाकूर यांनी पक्षसंघटनेतील धुगधुगी कायम ठेवली होती. आता रविशेठ पाटील यांनीच पक्षत्याग केल्याने पेण मतदारसंघातील पक्षसंघटनेला खिंडार पडेल हे निश्चित. आता अलिबागमध्ये पक्षाचे नेते काय भूमिका घेतात याची उत्सुकता आहे.

२५ वर्षे प्रतिकूल परिस्थितीत पक्षसंघटन मजबूत ठेवण्याचे काम आम्ही केले. पण आता ज्या शेकापशी आम्ही दोन हात करून लढलो, त्यांच्याशी जुळवून घेण्याचे सल्ले दिले जात आहेत. हे पटवून घ्यायचे तरी कसे, स्थानिक परिस्थितीचा विचार न करता आघाडय़ा होत असतील तर आमच्यासमोर दुसरा पर्याय राहिलेला नाही.

 – रविशेठ पाटील, माजी मंत्री