नंदुरबारमध्ये राष्ट्रवादी भाजपबरोबर

नीलेश पवार, लोकसत्ता

नंदुरबार : जिल्हा परिषद निवडणुकीपूर्वी काँग्रेसच्या अट्टाहासापायी आघाडीत झालेली ‘बिघाडी’ सत्तास्थापनेवेळी शिवसेनेच्या नरमाईच्या भूमिकेमुळे दूर झाली. त्यामुळे राज्यातील सर्वात तरूण जिल्हा परिषद अध्यक्ष निवडण्यात काँग्रेस-शिवसेनेला यश आले. महाविकास आघाडीतील घटक पक्ष राष्ट्रवादीने मात्र भाजपला साथ दिली.

जिल्हा परिषदेच्या निवडणूक निकालात कुठल्याही पक्षाला बहुमत गाठता आले नव्हते. ५६ पैकी काँग्रेस, भाजपला प्रत्येकी २३ जागा मिळाल्या. तर सात जागा मिळवणाऱ्या शिवसेनेकडे सत्तेची चावी गेल्याने सर्वाच्या नजरा जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपद निवडणुकीकडे लागल्या होत्या. शिवसेनेने काँग्रेसशी जुळवून घेत उपाध्यक्ष पदासह एक सभापतीपद पदरात पाडून घेतल्याने काँग्रेस-शिवसेनेतील वाद संपुष्टात आला.

अध्यक्षपदी काँग्रेसच्या २५ वर्षांच्या सिमा वळवी, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेचे राम रघुवंशी यांची निवड झाली. मतदानावेळी नाटय़मय घडामोडी घडल्या. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपने काँग्रेसच्या वळवींना पाठिंबा दिला. तर उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत सेनेच्या विरोधात मतदान केले. वरिष्ठ पातळीवरून आदेश आल्याने सेनेने अध्यक्षपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला साथ दिली. पण महाविकास आघाडीतील घटक असलेल्या राष्ट्रवादीचे तीनही सदस्य प्रारंभापासून भाजपच्या गोटात दिसून आले.

मुळात शरद गावित यांचे समर्थक असलेल्या या सदस्यांना पक्षाकडून महाआघाडीबाबत कुठलीही सूचना होऊ नये, याबाबत आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळेच जिल्हा परिषदेत वेगळेच समीकरण आकारास आले. आता जिल्हा परिषदेत काँग्रेस-शिवसेना अशी आघाडी असून महाआघाडीतील राष्ट्रवादी मात्र भाजप सोबत आहे.

पालकमंत्री के.सी. पाडवी यांनी निवडणुकीआधी महाआघाडीला विरोध केला होता. सेनेच्या वरिष्ठ नेत्यांनी त्याचा समाचार घेतला होता. यामुळे शिवसेना भाजपसोबत जाईल असा कयास बांधला गेला. मात्र मातोश्रीची मनधरणी करण्यात पालकमंत्र्यांना यश आल्याने काँग्रेसची सत्ता कायम राखणे शक्य झाले. जिल्हा परिषद निवडणुकीत पाडवी यांच्या पत्नी पराभूत झाल्या होत्या.

भाजपचे काँग्रेसला मतदान

अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारासह सर्वानीच काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. भाजपने काँग्रेसला विरोध न करता उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत केवळ सेना उमेदवाराला विरोध करण्याचे धोरण ठेवले. काँग्रेसचे पालकमंत्री के. सी. पाडवी, शिवसेनेचे चंद्रकांत रघुवंशी यांनी सत्तेचे समीकरण सोडवले. खासदार डॉ. हिना गावितांसह आमदार डॉ. विजयकुमार गावित हे सत्तेची जुळवाजुळव करण्यात अपयशी ठरल्याने भाजपला नंदुरबार जिल्हा परिषदेत विरोधी बाकावर बसावे लागले आहे.