दिगंबर शिंदे, लोकसत्ता

सांगली : जिल्ह्य़ात भाजपचा झेंडा सर्वप्रथम फडकवणारे मिरजेचे आमदार आणि माजी सामाजिक न्याय मंत्री सुरेश खाडे यांचे पक्षांतर्गत महत्त्व कमी करण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न पक्षीय पातळीवर सुरू असल्याचे गेल्या पाच-सहा महिन्यांतील घडामोडीवरून दिसत आहे. महापालिकेतील पदाधिकारी बदल असो वा जिल्हा परिषदेतील पदाधिकारी बदल असो, यामध्ये आमदार खाडे यांनी ज्याच्या नावांचा आग्रह धरला त्यांना बाजूला ठेवून इतरांनाच संधी दिल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत.

सांगली महापालिकेत काँग्रेसकडून सत्ता हस्तगत करण्यात आयारामांची मोलाची मदत झाली. ही मदत मिळविण्यात आणि पक्ष विस्तार करण्यात आमदार खाडे यांच्या मिरजेतील पुढाकाराचा सिंहाचा वाटा आहे. मिरजेतील आवटी गट भाजपवासीय झाला. या गटाचे १२ सदस्य महापालिकेत आहेत. या संख्याबळाच्या जोरावर महापालिकेतील लाभाची पदे मिळविण्यात हा गट सतत कार्यशील आणि प्रभावी राहिला आहे. अगदी पंधरा दिवसांपूर्वी महापौर व उपमहापौर निवडीवेळी या गटाने आपली ताकद दाखवत दबावाचे राजकारण करीत पदे पदरात पाडून घेतली.

जिल्हा  परिषद अध्यक्षपद मिरज तालुक्याच्या वाटय़ाला येणार हे निश्चित होताच राजकीय हालचाली गतिमान झाल्या होत्या. अध्यक्षपदासाठी मिरज तालुक्यातील प्राजक्ता कोरे आणि अनिता कोरबू यांची नावे चच्रेत होती. कोरबू यांच्या नावासाठी खाडे यांचा आग्रह होता. मात्र खासदार संजयकाका पाटील यांनी आपले वजन कोरे यांच्या पारडय़ात टाकले.

अध्यक्ष निवडीवेळी पडद्यामागे जोरदार हालचाली त्यावेळीही झाल्या होत्या. कोरे यांना अध्यक्षपद द्यावे यासाठी िलगायत समाज एकत्र येऊन माध्यमांकडे आग्रही मागणी करून दबावाचे राजकारणही केले गेले. याला शह देण्यासाठी खाडे यांच्या गटाकडून जिल्हा परिषद आणि मिरज पंचायत समितीमध्ये एरंडोली आणि नरवाड पाणीपुरवठा योजनेतील गैरव्यवहाराची लक्तरे वेशीवर टांगण्याचा प्रयत्न झाला. एकाच योजनेच्या चरीतून दोन गावच्या नलिका टाकून स्वतंत्र देयके अदा करण्यात आली असल्याचा आरोप होत असून योजना अद्याप पूर्ण नसताना बिले मात्र देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. या वरून या योजनेच्या ठेकेदारांना गोवण्याचा प्रयत्न या गटाकडून होत आहे. पक्षांतर्गत मतभेदातूनच हा गैरव्यवहार समोर आला असला तरी प्रत्यक्षात या प्रकरणी कोणतीही कारवाई झालेली नाही.

याचबरोबर पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष निवडीवेळीही आमदार खाडे यांनी स्वीय सहायक मोहन व्हनखंडे यांच्या नावाचा आग्रह धरला होता. मात्र प्रत्यक्ष निवडीवेळी व्हनखंडे यांचे पक्षासाठी योगदान काय, असा सवाल करीत कार्यकर्त्यांनी जोरदार विरोध केला. पक्षातून होत असलेला विरोध लक्षात घेउन आमदार खाडे यांना हा आग्रह सोडावा लागला. आणि एकेकाळी लोकसभेचे उमेदवार असलेले दीपक शिदे म्हैसाळकर यांना शहर जिल्हाध्यक्ष पद आयते मिळाले.

राज्य पातळीवर काम करीत असताना त्यांना पुन्हा शहर पातळीवर पाठविण्यात आले, यामागील कारण म्हणजे खाडे यांना ताकद मिळता कामा नये हा हेतू लपून राहिलेला नाही.

कुरघोडीचे राजकारण

एरंडोली आणि नरवाड या दोन गावांची पाणी योजनेसाठी सुमारे तीन कोटींचा खर्च करण्यात आला. या योजनेचे काम सुरू होउन एक दशकाहून अधिक काळ गेला. या दहा वर्षांत ९० टक्के निधी खर्च होऊनही लोकांना पिण्यासाठी अद्याप पाणी मिळत नसेल, तर यात यंत्रणा दोषी असल्याचे स्पष्ट आहे. या दिरंगाईला आणि गैरव्यवहाराला पाठीशी घालणारे जे कोणी असतील ते पुढे यावेत यासाठी संबंधितावर फौजदारी कारवाईची मागणी जिल्हा परिषदेच्या सभेत झाली. यामागे विद्यमान अध्यक्षा प्राजक्ता कोरे यांना अडचणीत आणण्याचा आणि राजकीय डाव साधण्याचा प्रयत्न दिसून येतो. एकदंरीतच सांगली जिल्ह्य़ात भाजपमध्ये आयाराम आणि जुन्याजाणत्यांमध्ये कुरघोडीचे राजकारण जोरात सुरू झाले आहे.

आमदार गटाला शह देण्याचा प्रयत्न..

स्थायी सदस्य निवडीवेळीही आ. खाडे यांनी पांडुरंग कोरे यांच्यासाठी ठाम आग्रह धरला होता. प्रसंगी आमदारकीही पणाला लावली. तरीही १२ सदस्यांच्या जोरावर आवटी गटाने वेठीस धरले. ऐनवेळी मोहना ठाणेदार या महिलेला संधी देण्यात आली. आवटी गटाचे संदीप आवटी यांना स्थायी सभापतीपद देऊन यावर मात करीत आमदार गटाला शह देण्याचा प्रयत्न झाला. नुकत्याच झालेल्या महापौर व उपमहापौर निवडीवेळी महापौर पद सांगलीला दिल्यानंतर उपमहापौरपदी कोणाची वर्णी लावायची, याची चर्चा सुरू झाली. त्यावेळीही खाडे यांनी कोरे यांच्या नावाचा आग्रह धरला. मात्र यावर मात करीत आवटी गटाने आनंदा देवमाने यांचे नाव पुढे करीत बाजी मारली. या सर्व घडामोडीवरून आमदार खाडे यांचे खच्चीकरण करण्याचे प्रयत्न अगदी खासदार गटापासून पक्षिय पातळीवर सुरू आहेत. मिरज पंचायत समिती असो वा जिल्हा परिषद, महापालिका या सर्वच ठिकाणी खाडे गटाला अनुल्लेखाने दूर सारण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आता मंत्री पदही औटघटकेचे ठरल्याने सत्ता असूनही उपवासी अशी गत आ. खाडे गटाची झाली आहे. सलग तीन वेळा आमदारकी पदरी असूनही आमदार खाडे यांचा गट मात्र जिल्ह्य़ात नाही गाव पातळीवरही प्रभावी ठरू शकलेला नाही.