सिमेंटच्या भावात १०० रुपयांची वाढ

लातूर  : दीड  महिन्याच्या टाळेबंदीचा कालावधी संपल्यानंतर ४ मेपासून प्रशासनाच्यावतीने काही व्यवसाय सुरू व्हावेत यासाठी ढील दिली आहे. शुक्रवार व शनिवार असे दोन दिवस सिमेंट, स्टील, हार्डवेअर विक्री सुरू आहे. गवंडय़ांच्या हाताला काम मिळावे यासाठी बांधकाम सुरू करण्यास परवानगी देण्यात आली. नव्याने बांधकाम करण्याचे धाडस कोणी करत नाही, मात्र अर्धवट बंद पडलेली बांधकामे सुरू करणाऱ्यांची आता अडचण निर्माण झाली आहे. सिमेंटच्या दरात तब्बल १०० रुपयाने वाढ  झाली आहे.

दीड महिन्यापूर्वी २७० ते ३०० रुपये या किमतीत सिमेंटचे पोते आता ३७० ते ४२० रुपये अशा दरात उपलब्ध आहे. बांधकामाला लागणाऱ्या सळईचा भाव दीड महिन्यापूर्वी ४० रुपये होता, तो आता ४५ रुपये झाला आहे. स्टील उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचे काम बंद आहे. कामगार आपापल्या गावी गेले आहेत. तीच अवस्था सिमेंटची आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे उपलब्ध माल आहे तोच माल आता भाव वाढवून विकला जातो आहे. यामुळे मध्यमवर्गीयांची कुचंबणा होते आहे. ज्या बांधकाम कंत्राटदारांनी पूर्वीच्या दरात कामे घेतली होती त्यांना आता बांधकाम अर्धवट सोडताही येत नाही व करताही येत नाही. सगळाच धंदा आतबट्टय़ाचा झाला आहे.

ज्योती हार्डवेअरचे लक्ष्मीकांत धूत यांच्याशी संपर्क साधला असता टाळेबंदीमुळे ही अवस्था निर्माण झाली असून आगामी काळात यात थोडासा बदल होईल. उन्हाळय़ात नवीन बांधकाम फारसे निघत नाहीत कारण लातुरात पाण्याची अडचण असते. पावसाळय़ानंतर थोडासा स्थितीत बदल होईल व हे वाढलेले भाव कमी होतील असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

वाळू उपलब्ध होण्यात मोठी अडचण होते आहे. १२ हजार रुपये ब्रासने वाळू विकली जात आहे. इतके पैसे देऊनही वाळू मिळेलच याची खात्री देता येत नाही. ठिकठिकाणी तहसीलदारांच्यावतीने वाळू साठय़ावर धाडी टाकल्या जात असल्याने त्याचा थेट फटका बांधकाम करणाऱ्या लोकांना बसतो आहे.

करोनापूर्वीची परिस्थिती व करोनानंतरची परिस्थिती यातील झालेला बदल हा लोकांना दीर्घकाळ सहन करावा लागणार आहे.