संपूर्ण जून कोरडा गेला असला तरी जुलैच्या मध्यात पावसाने जोर पकडला असून चार दिवसापासून संततधार पाऊस सुरू असल्याने जवळपास ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. या महिन्याच्या शेवटपर्यंत शंभर टक्के पेरण्या पूर्ण होतील. आता केवळ पावसाने साथ दिली पाहिजे, असे मत जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.डी.एल. जाधव यांनी व्यक्त केले.
दरवर्षी जूनमध्ये चांगला पाऊस झाल्यानंतर जुलैच्या मध्यांन्हापर्यंत पेरण्यांची कामे पूर्ण होतात, परंतु यावर्षी जून पूर्णत: कोरडा गेल्याने पेरण्या खोळंबल्या होत्या. आता जुलैच्या मध्यानंतर पावसाने जोर पकडला असून या जिल्ह्य़ात शनिवारी सायंकाळपासून सतत पाऊस सुरू असल्याने शेतात पेरण्यांच्या कामाला वेग आला आहे. कालपर्यंत जिल्ह्य़ात ८० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या असून येत्या तीन ते चार दिवसात शंभर टक्के पेरण्या होतील, असा विश्वास कृषी विभागाने व्यक्त केला आहे. यावर्षी सर्वाधिक पेरणी कापसाची १ लाख ३ हजार हेक्टरमध्ये करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ सोयाबिन ५३ हजार हेक्टरमध्ये पेरणी झाली. तूर २१ हजार ५० हेक्टर, तर धानाचे पऱ्हे टाकण्याच्या कामांना वेग आला आहे. कालपर्यंत २१ हजार धानाचे पऱ्हे टाकण्यात आले होते. हीच स्थिती राहिली तर यंदा पीक चांगले होईल, असा विश्वास जिल्हा कृषी अधीक्षक डॉ.जाधव यांनी लोकसत्ताजवळ बोलतांना व्यक्त केला.
तिकडे पावसामुळे शेतात शेतकरी राबतांनाचे चित्र बघायला मिळत आहे. हाच पाऊस आणखी किमान चार ते पाच दिवस असाच रिमझीम सुरू राहील, असा विश्वास हवामान खात्याकडून व्यक्त करण्यात आला. जिवती व कोरपना हे दोन तालुके वगळता जिल्ह्य़ात सर्वत्र चांगला पाऊस सुरू आहे. चिमूर, ब्रम्हपुरी, नागभीड, सिंदेवाही, मूल व सावली या धानाच्या भागात सरासरी इतकाच पाऊस झाल्याने रोवण्यांना गती आली आहे, तर गोंडपिंपरी, चंद्रपूर, पोंभूर्णा, बल्लारपूर, राजुरा, भद्रावती व वरोरा या सोयाबिन व कापसाच्या पट्टय़ातही चांगला पाऊस झाला आहे. या पावसाचा सर्वाधिक फायदा हा कापूस व धान पिकांना होणार असल्याची माहिती डॉ.जाधव यांनी दिली. तिकडे संततधार पावसामुळे नदीनाल्यांनाही पाणी आलेले आहे. वर्धा, वैनगंगा, पैनगंगा, ईरई, झरपट व उमा नदीला चांगले पाणी आहे.

२४ तासांतील पाऊस
गेल्या चोवीस तासात या जिल्ह्य़ात चंद्रपूर २०.१०, बल्लारपूर १९.०२, मूल २७, गोंडपिंपरी १८.२०, पोंभूर्णा २०, सावली ४०, वरोरा २३, भद्रावती २०, चिमूर ३८, ब्रम्हपुरी ६०.६०, सिंदेवाही ४३, नागभीड ४१.२०, राजुरा १५.३०, कोरपना १९.६०, जिवती २४.०६ मि.मी. पावसाची नोंद घेण्यात आली.

पाणीसाठय़ात वाढ
जिल्ह्य़ातील सर्व मध्यम प्रकल्पही चांगले भरलेले आहेत. आसोलामेंढा ४८.८२ टक्के द.ल.घ.मी, घोडाझरी १५.७५, नलेश्वर ३६.०६, चारगाव ६८.८३, अमलनाला २२.५४, पकडीगुड्डम १०.५१, डोंगरगाव १४.९०, दिना ३४.९०, इरई धरण ४४.३० टक्के, लभानसराड ७.११ तर चंदई धरण शंभर टक्के पाणी आहे.