अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे नवी मुंबई येथून आलेल्या एका व्यक्तीला करोना संसर्ग झाला आहे. तालुक्यातील करोनाचा हा पहिला रुग्ण असून मुंबईमार्गे अखेर करोना अकोले तालुक्यात पोहोचला आहे.

नवी मुंबई येथून ५६ वर्षीय व्यक्ती आपल्या मुलासह सुमारे दहा दिवसांपूर्वी लिंगदेव या आपल्या मूळ गावी आली. तेथील शाळेत या व्यक्तीला विलगीकरणात ठेवण्यात आले होते. दहा दिवसांचा  कालावधी संपल्यानंतर तसेच त्याला कोणताही त्रास होत नसल्यामुळे व लक्षणे दिसत नसल्यामुळे त्याला घरी सोडण्यात आले. मात्र काल या व्यक्तीचा घसा खवखवू लागल्यामुळे तपासणीसाठी संगमनेर येथील खासगी रुग्णालयात नेण्यात आले.तेथे त्याचा नमुना घेऊन तो तपासणीसाठी मुंबई येथील खासगी प्रयोग शाळेत पाठविण्यात आला. त्याचा अहवाल आज प्राप्त झाला असून तो पॉझिटिव्ह आला आहे.

दरम्यान, तहसीलदार मुकेश कांबळे यांचेसह विविध अधिकारी लिंगदेव येथे दाखल झाले आहेत. सदर व्यक्ती गावी आल्यापासून विलगीकरणामध्ये असल्यामुळे संक्रमण होण्याची फार शक्यता नाही. अर्थात त्याच्या निकट संपर्कात आलेल्यांची माहिती प्रशासन जमा करीत आहे. या व्यक्तीमध्ये सध्या अन्य कोणतीच लक्षणे दिसत नसल्याचे समजते. या व्यक्तीचा आलेला तपासणी अहवाल हा खासगी प्रयोग शाळेचा असल्यामुळे त्याचा नमुना सरकारी प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठविला जाईल. त्या अहवालानंतरच हा रुग्ण करोनाबाधित आहे की नाही, या वर शिक्कामोर्तब होईल. अकोल्यात करोना आला तर तो मुंबई मार्गेच येईल ही भीती अखेर खरी ठरली आहे.