जिल्ह्यात करोनाबाधितांचा आकडा मोठ्या प्रमाणात वाढत आहे. गेल्या चार दिवसांत दररोज पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या शंभरी पार करीत आहे. मात्र, तरीही यवतमाळ जिल्ह्याचा करोना मृत्यूदर २.६८ टक्के आहे. पॉझिटिव्ह रूग्ण आढळण्याचा दर १० टक्क्यांपेक्षा कमी असायला हवा तो दर जिल्ह्यात ७.७ टक्के आहे. तर रूग्णांचे बरे होण्याचे प्रमाण ६३ टक्के असल्याची माहिती जिल्हाधिकारी एम. डी. सिंह यांनी दिली. शासनाच्या धोरणानुसार ‘अनलॉक’ प्रक्रिया सुरू झाली. मात्र, नागरिकांना करोना प्रादुर्भावाचे अद्यापही गांभीर्य नाही. करोनास हरवायचे असेल तर बिनधास्तपणा सोडावाच लागेल, असे आवाहनही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी केले.

जिल्ह्यातील करोनासंदर्भात माहिती देण्यासाठी आज बुधवारी नियोजन भवनात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. १० मार्च रोजी जिल्ह्यात सर्वप्रथम तीन करोना सकारात्मक रूग्ण आढळले होते. आज पाच महिन्यांनंतर रूग्णसंख्या दोन हजारांच्या घरात पोहचली. मात्र नागरिक अद्यापही करोना संसर्गास गांभीर्याने घ्यायला तयार नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.

एकूण बाधित रूग्णांपैकी आतापर्यंत एक हजार २५० रूग्ण उपचारानंतर घरी गेले आहेत. यात ७०७ पुरुष आणि ५४३ महिला आहेत. २९ मेपर्यंत जिल्ह्यात एकाही करोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नव्हता. सध्या ही संख्या ५० वर पेाहचली. त्यात ३२ पुरूष आणि १८ महिलांचा समावेश आहे. मृतांमध्ये यवतमाळ शहरातील १३, नेर शहर व ग्रामीण भाग प्रत्येकी दोन, दारव्हा शहरातील तीन, दिग्रस शहरातील तीन व ग्रामीण भागातील दोन, आर्णी शहरातील दोन, पांढरकवडा शहरातील दोन, महागाव शहरातील दोन, उमरखेड शहर व ग्रामीण भागातील प्रत्येकी तीन, पुसद शहरातील नऊ व ग्रामीण भागातील दोन, झरी ग्रामीण भागातील एक, कळंब ग्रामीण भागातील एकाचा मृत्यु झाला आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत ‘सारी’चे ५८१ रुग्ण भरती झाले असून यांपैकी ५६ सकारात्मक आढळले. सारी आणि करोना सकारात्मक असलेल्या ४३ आणि फक्त सारी असलेले ४२ जण असे एकूण ८५ मृत्यू झाल्याची माहिती सिंह यांनी दिली. जिल्ह्यात आतापर्यंत ४४ करोना रूग्णांना गृहविलगीकरणात उपचारांची सोय देण्यात आली आहे.

ॲन्टिजन किटसाठी प्रशासनाने दोन कोटी रुपये मंजूर केले आहे. यात जिल्ह्यासाठी ३२ हजार ५०० किट खरेदी करण्यात आल्या असून आणखी ३० हजार किट खरेदी करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांच्यासह वैद्यकीय, आरोग्य विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

२५ हजार नमुन्यांची तपासणी

जिल्ह्यात १३७ प्रतिबंधित क्षेत्र आहे. २६५ पथकांद्वारे एकूण ५३० कर्मचाऱ्यांकडून घरोघरी सर्व्हे करण्यात येत आहे. आतापर्यंत नऊ हजार ५०० घरांचा सर्व्हे झाला असून दोन हजार १२० नमुने घेण्यात आले आहेत. जिल्ह्यातील ३७ कोविड केअर सेंटरमध्ये एकूण खाटांची क्षमता दोन हजार ९५६, सहा कोविड हेल्थ सेंटरमध्ये खाटांची क्षमता ५८० आणि वैद्यकीय महाविद्यालयात विलगीकरण कक्षात ५०० खाटा, अशा एकूण चार हजार खाटा रुग्णांसाठी उपलब्ध आहेत. यांपैकी आतापर्यंत केवळ १५ टक्के खाटा उपयोगात आल्या आहेत. जिल्ह्यात ९२ फिवर क्लिनिक सुरु करण्यात आले. याद्वारे १८ हजार १५७ जणांची तपासणी करण्यात आली आहे. जिल्ह्यात ‘व्हीआरडीएल लॅब’ सुरु झाल्यानंतर आतापर्यंत जवळपास २५ हजार नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.