महाराष्ट्रात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक आदी शहरी भागातच नव्हे तर ग्रामीण भागातही रेमडेसिवीर मिळावे यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची धावपळ सुरु आहे. वाढते करोना रुग्ण आणि रेमडेसिवीरचा पुरवठा याचे प्रमाण रोजच्या रोज व्यस्त बनत चालले आहे. राज्यात करोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर औषधांसाठी रुग्णांचे नातेवाईकांचे हाल होताना दिसत आहेत. रुग्ण आणि नातेवाईकांची ससेहोलपट पाहून सरकारने रेमडेसिवीरचं उत्पादन दुप्पट करण्याची परवानगी दिली आहे. तसेच सरकारच्या हस्तक्षेपानंतर रेमडेसिवीर निर्मिती करण्याऱ्या कंपन्यांनी इंजेक्शनच्या किंमती कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्ष वर्धन यांनी ट्वीट करुन ही माहिती दिली आहे. यामुळे करोना रुग्णांसोबत त्यांच्या नातेवाईकांना दिलासा मिळणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता कंपन्यांचे नवे दर कसे असतील वाचा

  • कॅडिला हेल्थकेअर लिमिटेड रेमडॅक इंजेक्शनचा दर २८०० रुपयांवरून ८९९ रुपये केला आहे.
  • सिजीन इंटरनॅशनल लिमिटेडनं रेमविन इंजेक्शनचा दर ३९५० रुपयांवरुन २४५० रुपये इतका केला आहे.
  • डॉ. रेड्डीज लॅबोरेट्रीज लिमिटेडनं रेडिक्स इंजेक्शनचा दर ५४०० रुपयांवरून २७०० इतका केला आहे.
  • सिपला लिमिटेडनं सिप्रेमी इंजेक्शनचा दर ४००० रुपयांवरून ३००० रुपये इतका केला आहे.
  • मायलॅन फार्मास्युटिकल्स प्रायव्हेट लिमिटेडनं डेसरेम या इंजेक्शनचा दर ४८०० रुपयांवरून ३४०० इतका केला आहे.
  • ज्युबिलँट जेनेरिक लिमिटेडनं जुबी-आर इंजेक्शनचा दर ४७०० रुपयांवरून ३४०० रुपये इतका केला आहे.
  • हेटेरो हेल्थकेअर लिमिटेडनं कोविफोर या इंजेक्शनचा दर ५४०० रुपयांवरून ३४९० रुपये इतका केला आहे.

“महाराष्ट्रासाठी अन्य राज्यांकडून रेल्वेद्वारे ऑक्सिजन वाहतुकीची परवानगी द्या”

डिसेंबर २०२० मध्ये करोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानंतर रेमडेसिवीर तयार करण्याऱ्या कंपन्यांनी उत्पादन घटवलं होतं. त्यात करोनाची दूसरी लाट आल्याने रेमडेसिवीरची मागणी वाढली. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना रेमडेसिवीर मिळवण्यासाठी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तसेच रेमडेसिवीरची काळ्या बाजारात विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने त्याच्या निर्यातीवर रविवारी बंदी घातली. या इंजेक्शनची साठेबाजी आणि काळ्याबाजाराला आळा घालण्याचे निर्देशही राज्यांना देण्यात आले आहेत.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Corona pandamic demand of remdesivir and affordability the govt has capped its price rmt
First published on: 17-04-2021 at 19:52 IST