गुजरात राज्यातील वेरावळ, पोरबंदर, मांगरूळ आदी भागात काम करणाऱ्या खलाशांना आपल्या मूळ घरी परतण्यासाठी २२ ते २५ बोटी महाराष्ट्राच्या दिशेने निघाल्या असून ९० खलाशी घेऊन येणारी पहिली बोट पालघर जिल्ह्यातील झाई किनार्‍यावर पोहोचली आहे. या बोटींमधून दोन ते अडीच हजार खलाशी पालघर जिल्ह्यात दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

यापूर्वी वेरावळ येथील सुमारे ८०० पालघर जिल्ह्यातील खलाशांना नारंगोळ या गुजरात राज्यातील बंदरावर उतरून न दिल्याने त्या खलाशांना नाईलाजाने परतावे लागले होते. मात्र, गुजरात राज्यात देखील त्यांची खाण्या-पिण्याची परवड होत असल्याने त्यांनी आपल्या मायभूमीत येण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात येते. या खलाशांना उतरून आश्रमशाळांमध्ये किंवा अन्य ठिकाणी अलगीकरण करणे जिल्हा प्रशासनाची जबाबदारी राहणार असून त्यादृष्टीने तयारी सुरू असल्याचे सांगण्यात येते.

झाई येथे दाखल झालेल्या खलाशांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना झाईच्या शासकीय आश्रम शाळेत अलगीकरण करून ठेवण्याबाबत ची व्यवस्था जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे.