•  ‘ई-पंचसूत्री’चे पालन केल्यास हमखास रोग निवारण
  • दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या तज्ज्ञांचे मत

 

वर्धा : करोनामुक्त नागरिकांसाठी बुरशीचे संक्रमण ‘म्युकरमायकोसिस’च्या रूपाने प्राणसंकट बनले आहे. करोना उपचारात स्टेरॉईड व अन्य इंजेक्शन देण्यात आलेले वयस्कर रुग्ण या आजाराला सामोरे जात असून ‘ई-पंचसूत्री’चे पालन केल्यास हमखास रोग निवारण होत असल्याची भूमिका दत्ता मेघे आयुर्विज्ञान अभिमत विद्यापीठाच्या तज्ज्ञांनी मांडली आहे.

विद्यापीठाच्या शरद पवार दंत रुग्णालयात या व्याधीवर यापूर्वी अनेक शस्त्रक्रिया झाल्या आहेत. मात्र गेल्या सहा महिन्यात रुग्णांचे प्रमाण वाढल्याचे रुग्णालयाच्या आकडेवारीतून दिसून येते. या पार्श्वभूमीवर सावंगीच्या रुग्णालयात ३० खाटांचा विशेष कक्ष कार्यान्वित झाला आहे. या व्याधीच्या २४ रुग्णांवर उपचार सुरू असून १२ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्या. विद्यापीठाचे कुलगुरू व प्रसिद्ध मुख शल्यचिकित्सक डॉ. राजीव बोरले म्हणाले की, हा बुरशीजन्य आजार पूर्वीपासून वैद्यकीय क्षेत्राला परिचित आहे. साधारणत: नाक किंवा सायनसच्या माध्यमातून शरीरात प्रवेश करणारा हा आजार नाक आणि डोळ्यांची हानी करतो. तसेच वरचा जबडा, सायनस व फुफ्फुसांना बाधित करणारा हा आजार श्वसनयंत्रणा डोळे आणि मेंदूवर विपरीत परिणाम करतो, असे डॉ. बोरले यांनी नमूद केले. मुख शल्यचिकित्सा विभाग प्रमुख डॉ. नितीन भोला यांनी नमूद केले की, भारतात १ लाख लोकसंख्येमागे १४ रुग्ण असे या आजाराचे प्रमाण आहे. मध्य भारतातील विविध जिल्ह्यातील रुग्णांवर येथे उपचार झालेत. आजार संसर्गजन्य नसला तरी करोनामुक्त झाल्यावरही काळजी घेणे आवश्यक आहे. शरीरात निरंतर वाढत जाणारी बुरशी डोळे, नाक, चेहरा, टाळू व शेवटी मेंदूवर आघात करते. सतत डोकेदुखी, डोळ्यांमधून पाणी गळणे, अंधूक दिसणे, दात दुखणे, त्वचा लालसर काळपट होणे, घसा बसणे अशी लक्षणे दिसतात. हे दिसून येताच तत्परतेने वैद्यकीय उपचार आवश्यक ठरत असल्याचे नाक, कान, घसारोग तज्ज्ञ डॉ. प्रसाद देशमुख यांनी सांगितले. करोना उपचारात ज्यांना स्टेरॉईड किंवा टॉसिलिझुमॅप इंजेक्शन देण्यात आले किंवा जे रुग्ण तीन आठवड्यापेक्षा अधिक काळ प्राणवायू उपचारावर होते, अशा साठ वर्षांवरील रुग्णांना या आजाराचा सामना करावा लागत आहे. म्हणून अत्याधिक गरज असेल तरच या इंजेक्शनचा वापर केला पाहिजे, असा सल्ला नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. सचिन डायगव्हाणे यांनी दिला. रोग निवारणासाठी ‘एज्युकेशन, अर्ली डिटेक्शन, एंडोस्कोपिक स्क्रिनिंग, इर्मजन्सी सर्जरी व इकॉनॉमिक सपोर्ट’ ही ई-पंचसूत्री आवश्यक ठरल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. चंद्रशेखर महाकाळकर यांनी सूचित केले. या आजारावरील औषधोपचार महात्मा ज्योतिबा फु ले जन आरोग्य योजनेतून मोफ त केल्या जात असल्याचे रुग्णालयाने स्पष्ट केले.

यवतमाळात ‘म्युकरमायकोसिस’ग्रस्त पहिल्या मृत्यूची नोंद

यवतमाळ : करोनापश्चात भेडसावणाऱ्या ‘म्युकरमायकोसिस’ने यवतमाळातही शिरकाव केला असून या आजाराने येथे एका ६० वर्षीय वृद्धेचा मृत्यू झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. याशिवाय आणखी ११ रुग्णांना ‘म्युकरमायकोसिस’ने ग्रासले आहे. ‘म्युकरमायकोसिस’ आजाराने १४ मे रोजी या महिलेचा मृत्यू झाल्यानंतर वैद्यकीय प्रशासनाने सोमवारी त्याबाबत माहिती दिली.

जिल्ह्यात ‘म्युकरमायकोसिस’चे ग्रामीण व शहरी भागात किमान ११ रुग्ण असल्याचे वैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सांगण्यात आले. याला महाविद्यालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सुरेंद्र भुयार व जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी दुजोरा दिला. एका ६० वर्षीय महिला रुग्णाचा मृत्यू झाला तर अन्य रुग्णांवर उपचार सुरू आहेत. एका रुग्णास उपचारानंतर सुटी देण्यात आल्याचेही सांगण्यात आले. जिल्ह्यात गेल्या आठवड्यात ‘म्युकरमायकोसिस’ग्रस्त सात रुग्णांची नोंद झाल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी सांगितले. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात चार रुग्ण आढळले तर खासगी दवाखान्यांमध्येही रुग्ण असल्याचे डॉ. भुयार यांनी सांगितले. वणी विभागात झरी तालुक्यातील बोपापूर भागात ६५ वर्षीय पुरुष या आजराने ग्रस्त आहे. त्याला वणी येथे ट्रामा केअर सेंटरमध्ये करोनाचे निदान झाल्याने उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. प्रकृती ठीक झाल्यानंतर ९ मे रोजी सुटी देण्यात आली होती. मात्र घरी गेल्यानंतर त्याला त्रास वाढल्याने १५ मे रोजी त्याला पुन्हा वणी येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे त्याला म्युकरमायकोसिस आजाराची सुरुवात असल्याचे निदान झाल्याने यवतमाळ येथे दाखल करण्यात आले.

या आजाराविरुद्ध लढण्यासाठी वैद्यकीय प्रशासनाने स्वतंत्र व्यवस्था निर्माण केली आहे. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील वॉर्ड क्रमांक १७ मध्ये १५ खाटांची व्यवस्था करण्यात आली आहे. करोना उपचारात स्टारॉईडच्याअति वापरासारख्या कारणांनी रुग्णाची प्रतिकारशक्ती कमी होत असल्याने हा फंगस क्रियाशील होत असल्याचे डॉ. सुरेंद्र भुयार यांनी सांगितले.