मुंबईत राज्यातील सर्वाधिक करोनाग्रस्त रुग्ण आहेत. आरोग्य विभागासह प्रशासनाच्या वतीनं यावर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, मुंबई महापालिकेनं करोनाग्रस्त रुग्णांच्या संपर्कात आलेल्या रुग्णांच्या तपासणीच्या नियमांमध्ये बदल केले. या बदलांविषयी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे चिंता व्यक्त केली आहे. महापालिकेनं निकष बदलल्यामुळे मुंबईत करोना विषाणू पसरण्याचा धोका आहे,’ असा इशारा त्यांनी दिला आहे.

माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना मुंबई महापालिकेनं बदलेल्या निकषासंदर्भात पत्र दिलं आहे. “करोनाच्या चाचणीबद्दल भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं (ICMR) वेळोवेळी स्पष्ट निर्देस दिले आहेत. आतापर्यंत परिषदेनं ४ निर्देश दिले आहेत. यात पाचव्या निर्देशामध्ये असं स्पष्ट करण्यात आलं आहे की, ‘ज्या अतिजोखमीच्या व्यक्तींमध्ये रोगाची लक्षणं नाहीत, परंतु तो करोनाग्रस्ताच्या संपर्कात आला आहे. अशांची संपर्कात येण्याच्या पाचव्या दिवसापासून ते १४ दिवसांपर्यंत एकदा तपासणी करण्यात यावी,’असं म्हटलं असल्याचं फडणवीस यांनी पत्रात नमूद केलं आहे.

“असा स्पष्ट आदेश असताना मुंबई महापालिकेनं अशा अतिजोखमीच्या संपर्कांची तपासणी करण्याची गरज नाही,’ असा बदल केला आहे. यावरून माध्यमांमध्ये चर्चा झाल्यानंतर महापालिकेनं त्यात बदल केला. अतिजोखमीच्या व्यक्तीला पाचव्या दिवशी निरीक्षण करून लक्षणं दिसली तरच त्याची चाचणी करता येईल,’ असा बदल केला. चीनमध्ये ४४ टक्के प्रकरणांमध्ये लक्षणं नसलेल्या व्यक्तींकडून दुसऱ्यांना करोनाचा संसर्ग झालेला आहे. त्यामुळे निकषात बदल केल्यानं रुग्णांची संख्या कमी दिसणार असली, तरी करोनाचा प्रसार रोखण्यास कोणतीही मदत होणार नाही. मुंबई महापालिकेनंही ICMR च्या निकषांप्रमाणेच आदेश जारी करायला हवे. तसे निर्देश आपण द्यावेत,’ अशी मागणी फडणवीस यांनी केली आहे.