रायगड जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा ४९ वर पोहोचला आहे. जिल्ह्यात श्रीवर्धन येथे चार तर पनवेल विचूंबे येथील एकाला करोनाची बाधा झाल्याचे निष्पन्न झाले आहे. तर पोलादपूर येथील करोना बाधित महिलेचा मुंबईत उपचारादरम्यान मृत्यू झाला.

श्रीवर्धन येथील भोस्ते गावात शुक्रवारी एक करोना बाधित आढळला होता. याच्या संपर्कातील २८ जणांची तपासणी करण्यात आली. यातील २४ जणांचे तपासणी अहवाल नकारात्मक आले. तर घरातील चार जणांना करोनाची लागण झाल्याचे रविवारी स्पष्ट झाले. पनवेल तालुक्यातील विचूंबे येथील एका परप्रांतियाला करोनाची बाधा झाल्याचा अहवाल रविवारी प्राप्त झाला. हा तरुण मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे कामाला होता. प्रवासा दरम्यान त्याला करोनाची बाधा झाली असण्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. पोलादपूर येथील एका महिलेला शनिवारी करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. मात्र तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

दिलासादायक बातमी म्हणजे पनवेल येथे उपचारासाठी दाखल असलेल्या करोना बाधितांपैकी १० जणांचे स्वॅब शनिवारी तपासणीसाठी पाठवले होते. ते अहवाल नकारात्मक आले आहेत. आज पुन्हा एकदा त्यांचे स्वॅब तपासणीसाठी पाठवले आहेत. ते नकारात्मक आले तर सर्वांना रुग्णालयातून घरी पाठविण्याबाबत सोमवारी डॉक्टर निर्णय घेणार आहेत.