जगभरात थैमान घालत असलेल्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव एकीकडे देशात झपाट्याने वाढत असताना, करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. देशात चोवीस तासांत ६९ हजार ९२१ करोनाबाधित रुग्णांची नोंद झाली असताना, दुसरीकडे मागील चोवीस तासांत ६५ हजार ८१ जण करोनामुक्त झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तर, ज्या राज्यांमध्ये करोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत आहेत, त्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा देखील समावेश आहे.

राज्यात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही अंशतः वाढ झालेली असून हा आकडा आता ७२.०४ वरुन ७२.३७ टक्क्यांवर येऊन ठेपला आहे.

देशात करोना चाचण्यांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ४.३ कोटी पेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत. मागील दोन आठवड्यांमध्ये १ कोटी २२ लाख ५१४ चाचण्या झाल्या आहेत. ज्या राज्यांमध्ये करोनाच्या सर्वाधिक चाचण्या होत आहेत, त्यामध्ये तामिळनाडू, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्र ही तीन राज्यं अग्रस्थानी आहेत. देशभरात मागील चोवीस तासांमध्ये दहा लाखांपेक्षा जास्त चाचण्या झाल्या आहेत.

देशातील करोनाबाधितांची संख्या ३७ लाखांच्या उंबरठ्यावर पोहचली आहे. तर, करोनामुक्त झालेल्यांची संख्या २८ लाख ३९ हजार ८८२ पोहचली आहे. देशाचा रिकव्हरी रेट ७७ टक्क्यांवर पोहचल आहे. देशातील अॅक्टिव्ह रुग्णांपेक्षा करोनामुक्त होणाऱ्यांची संख्या अधिक आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.

आणखी वाचा- दिल्लीला मागे टाकत पुणे बनलं करोनाबाधितांची राजधानी; देशातील रुग्णसंख्या ३६ लाखांच्या पार

गेल्या काही दिवसांपासून दर दिवशी देशात जवळपास ८० हजार करोनाबाधित रुग्णांची नोंद होत असताना मंगळवारी संख्येत घसरण झाली असून थोडा दिलासा मिळाला आहे. तर, देशात मागील चोवीस तासांत ८१९ मृत्यूंची नोंद झाली असून मृत रुग्णांची संख्या ६५ हजार २८८ इतकी झाली आहे.

आणखी वाचा- भारतातील करोनाबाधित रुग्णसंख्या ३७ लाखांजवळ, ६५ हजार मृत्यू

जगभरात करोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे. अशा परिस्थितीतच अर्थव्यवस्थेची गाडी रुळावर आणण्यासाठी अनेक देशांकडून आता जनजीवन पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, कोणत्याही देशानं करोनाची महामारी संपली आहे, अशा पद्धतीनं वागू नये असं आवाहन जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक ट्रेडोस अधनोम गेब्रेयेसस यांनी केलं. तसंच कोणत्याही नियंत्रणाशिवाय निर्बंध उठवणं विध्वंसाला निमंत्रण देण्यासारखंच आहे, असंही ते म्हणाले.