करोनाचा मुकाबला करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी येत्या १४ एप्रिलपर्यंत लॉकडाउन जाहीर केला आहे. करोना हा साथीचा रोग गर्दीतून अधिक पसरतो. त्यामुळे आता सार्वजनिक उत्सव साजरे करण्याची ही वेळ नाही. करोना या महामारीविरुद्ध लढण्याची ही वेळ आहे. त्यामुळे या वर्षी १४ एप्रिल रोजी येणारी भीमजयंती घरी थांबूनच साजरी करूया असं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोनाविरुद्धचा मुकाबला जिंकल्यानंतर १४ एप्रिलनंतर आपण भीमजयंती साजरी करूया. त्या आधी करोनाविरुद्धचे युद्ध जिंकण्याचा संकल्प करा. संयम ठेऊन घरीच थांबा आवाहन रामदास आठवले यांनी केलं आहे.

दरवर्षी १४ एप्रिल रोजी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती धुमधडाक्यात साजरी होते. यावर्षी मात्र सार्वजनिक कार्यक्रम साजरा करण्याची वेळ नाही. यंदा गुढी पाडव्याच्याही शोभायात्रा रद्द झाल्या. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करावेत आणि घरीच जनतेने राहून येत्या १४ एप्रिल पर्यंत २१ दिवसांचा जनता कर्फ्यू यशस्वी करावा असे सांगत आपणच आहोत आपले रक्षक, नका होऊ स्वतःचे भक्षक असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी हातावर पोट असणाऱ्या कामगारांसाठी एक हजार ७० लाख कोटींचे पॅकेज जाहीर करून गरिबांना नवसंजीवनी दिली आहे असं सांगत त्यांनी निर्णयाचं स्वागत केलं.

करोनामुळे हातावर पोट असणारे असंघटित कामगार, गोर गरीब झोपडीवासियांचे, रोजंदारी मजुरांची आर्थिक स्थिती बिकट आहे. ज्यांनी कर्ज घेतले आहे अशा लोकांचे मासिक हफ्ते भरण्यास बँकांनी मार्च आणि एप्रिल महिन्याची सूट द्यावी. दोन महिन्यांचे रेशन अन्नधान्य गरिबांना मोफत द्यावे. त्यासाठी केंद्र सरकारने मदत जाहीर केली आहे. आता खासगी उद्योजकांनी सीएसआर फंडातून गरिबांना मदत करावी असं रामदास आठवले यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Coronavirus rpi ramdas athavle dr babasaheb ambedkar birth anniversary sgy
First published on: 26-03-2020 at 20:24 IST