पंतप्रधान नरेंद्र मोदींना करोनामुळे जीव गमावलेल्यांबद्दल बोलताना शोक अनावर झाल्यानंतर विरोधकांनी त्यांच्यावर निशाणा साधला आहे. उत्तर प्रदेशातील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना मोदींनी करोनामुळे मृत्यू झालेल्यांना श्रद्धांजली वाहताना शोक व्यक्त केला होता. दरम्यान मोदींनी टीव्हीवर येऊन रडू नये; आता तर त्यांचे भक्तही ऐकणार नाहीत अशा शब्दात एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी टीका केली आहे. ते एबीपी माझाशी बोलत होते.

“मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही १ जूननंतर ऐकणार नाही”

इम्तियाज जलील यांनी यावेळी राज्यात १ जूननंतर लॉकडाउन लावला तर दुकानं उघडण्याचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी मुख्यमंत्री आणि पंतप्रधानांचं ऐकणार नाही असंही म्हटलं आहे.

मोदींचं तर भक्तही ऐकणार नाहीत-
“पंतप्रधानांचं तर आम्ही २०० टक्के ऐकणार नाही. या देशात त्यांचे भक्तही ऐकणार नाही. त्याचं कारण जेव्हा देशात लाखोंच्या संख्येने लोक रडत होते तर आदरणीय पंतप्रधान पश्चिम बंगालमध्ये जाऊन ‘दीदी ओ दीदी’ असं करत होते. आता लोक त्यांना ‘दादा गप्प बस दादा’..म्हणणार आहेत. आता ती वेळ आली असून स्वत: पंतप्रधानांनी ती आणली आहे. आता टीव्हीवर येऊन रडण्याचं काही कारण नाही. आम्हाला माहिती आहे कोण कसा अभिनय करतं. लोकांना सांभाळण्याची वेळ होती तेव्हा जाऊन प्रचार करत होतात, लाखोंच्या संख्येने गर्दी गोळा करत होतात आणि आता ज्ञान पाजळत आहात,” अशा शब्दांत यावेळी त्यांनी संताप व्यक्त केला.

मुख्यमंत्री, पंतप्रधानांनी ज्ञान पाजळू नये –
“कोणत्याही परिस्थितीत लॉकडाउन शिथील करण्याची गरज असून आम्ही लॉकडाउनचं पालन करणार नाही असं औरंगाबादची जनता सांगत आहे. त्यांच्या बोलण्यातही लॉजिक आहे. कारण दोन महिन्यांपूर्वी शहराचा आकडा १८०० वर गेला होता, पण आज आपण १२० वर आलो आहोत. ग्रामीण भागात २०० च्या आसपास आलो आहोत. लोकांनी इतकं सहकार्य दिलं, इतकं कष्ट सहन करुन आकडेवारी कमी केली. आता पुन्हा पंतप्रधान, मुख्यमंत्री टीव्हीवर येऊन आम्हाला ज्ञान पाजळणार असतील तर कोणीही कोणाचं ऐकणार नाही. मग पंतप्रधान, मुख्यमंत्री किंवा मी सांगो…लोक १ तारखेनंतर ऐकणार नाहीत,” असं इम्तियाज जलील यांनी सांगितलं आहे.