‘माझ्या महाराष्ट्रात तुझी जास्त गरज आहे, जा रे जा रे पावसा’ याच शब्दात भारतीय संघाचा सदस्य असलेल्या मराठमोळ्या केदार जाधवने वरुणराजाला विनवणी केली होती. केदारची ही विनवणी वरुराजाने दोन आठवड्यांनंतर खूपच मानवर घेतल्याचे चित्र दिसत आहे. महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये शुक्रवारपासून म्हणजेच २८ जून पासून मध्यम ते जोरदार स्वरुपाचा पाऊस पडत आहे. त्यामुळे इंग्लंडमधील विश्वचषकांच्या सामन्यामध्ये पडणार पावसाने तिकडे सुट्टी घेत केदारच्या सांगण्यानुसार महाराष्ट्रावर कृपादृष्टी दाखवल्याची चर्चा सोशल मिडियावर रंगली आहे.

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या विश्वचषक स्पर्धेतील काही सामने पावसामुळे रद्द करण्यात आले. पावसाचा जोर इतका होता की खेळाडूंना मैदानावरही येण्याची संधी पावसाने दिली नाही. जूनच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या आठवड्यातील बहुतांश सामन्यांवर पावसाचं सावट होतं. त्याच वेळी सर्वांचं लक्ष लागून असलेल्या भारत विरुद्ध पाक सामन्यातही पावसाचा व्यत्यय येण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. त्यावेळी केदार जाधवने न्यूझीलंडविरुद्ध सामन्याआधी, नॉटिंगहॅम शहरात आकाशात गर्दी केलेल्या ढगांकडे पाहून, वरुणराजाला एक सुंदर प्रार्थना केली होती. ‘माझ्या महाराष्ट्रात तुझी जास्त गरज आहे’, असं म्हणत केदारने ‘जा रे जा रे पावसा’ अशी वरुणराजाला विनवणी केली होती. महाराष्ट्रात पावसाची जास्त गरज आहे इथे नाही असंही केदारने या व्हिडिओमध्ये हात जोडून सांगितले होते. पावसाळा लांबणीवर पडल्याने मराठवाडा, विदर्भ, खानदेशातील दुष्काळजन्य परिस्थिती अधिक बिकट होत चाललेली. त्याच पार्श्वभूमीवर केदार ने शेअर केलेला हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. केदारच्या या व्हिडिओला साद घालत वायू वादळामुळे लांबणीवर पडलेला मान्सूनचा पाऊस अखेर मुंबईसहीत महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये दाखल झाला आहे.

शुक्रवारपासूनच मुंबईसह राज्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. त्यातच आता पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. तसेच कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही ठिकाणी अतिवृष्टीचाही इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, एका दिवसात २०० मिलीमीटर इतका पाऊस होऊ शकतो, असा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. कोकण आणि गोव्यामध्ये ५ जुलैपर्यंत मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ५ जुलैपर्यंत कमी अधिक प्रमाणात पर्जन्यवृष्टी होऊ शकते. तर मध्य महाराष्ट्रात ३ जुलै रोजी मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच विदर्भातही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. ४ जुलैपर्यंत राज्यात मुसळधार पाऊस कोसळणार असून ५ जुलैनंतर पाऊस कमी होत, जाईल, असे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आहे.