निवडणूक निकाल लागल्यानंतरही आपसातील हेवेदावे थांबायला तयार नाहीत. तुम्ही काँग्रेसला मतदान का केले नाही, असे म्हणून मायलेकास शिवीगाळ आणि मारहाण केली व महिलेस चाकूने वार करून गंभीर जखमी केले. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी १९जणांविरुद्ध गुन्हय़ाची नोंद केली. दुसरीकडे महिला व नातेवाइकांना मारहाण होत असताना ती सोडविण्याचा प्रयत्न केल्याने लोखंडी रॉडने महिलेचा डावा पाय फ्रॅक्चर केला व कुटुंबाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसात २०-२२जणांवर गुन्हा नोंदविण्यात आला. मुकुंदवाडी भागातील संतोषीमातानगर येथे शनिवारी सकाळी हा प्रकार घडला.
आशा गणपत शेजूळ (वय ५०, संतोषीमातानगर) हिने पहिली फिर्याद दिली. त्यानुसार आपण मुलासह घरापुढे उभे असताना किरण मोरे व त्याच्यासह अन्य लोकांनी तेथे येऊन ‘तुम्ही काँग्रेसला मतदान का केले नाही’ असे म्हणून शिवीगाळ केली. शेजूळ यांनी समजावण्याचा प्रयत्न केला असता आरोपींनी लाठय़ाकाठय़ांनी मारहाण केली, तसेच मोरे याने चाकूने आपल्या उजव्या पायावर वार करून गंभीर दुखापत केली. जीवे मारण्याची धमकी दिल्याचे शेजूळ यांनी म्हटले आहे. मोरे याच्यासह प्रकाश कोतकर, संजय पारखे, चंद्रकांत मोरे, विलास नरवडे, बंडू खोतकर, प्रवीण खोतकर, मनीषा वाघमारे, राजू वाघमारे, नीलेश भुजंग, सुशीलाबाई उगले, राहुल उगले, राजू बवेरिया, किरण मोरेची आई, शेख शब्बीर शेख महेबूब, रमेश इंगळे व अन्य तिघांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा नोंदविला.
किरण देवराव मोरे (वय २७, संतोषीमातानगर) याने दिलेल्या फिर्यादीनुसार सकाळी कामावरून घरी जात असताना मनीषा वाघमारे हिला तिच्या घरासमोर मारहाण होत असल्याचे पाहून आपण भांडण सोडविण्याचा प्रयत्न केला. या वेळी आरोपींनी आपणास शिवीगाळ व मारहाण केली. अनिल दाभाडे याने लोखंडी रॉडने मारून आपला डावा पाय फ्रॅक्चर केला, तसेच वाघमारेसह तिच्या कुटुंबाला तलवारीने जीवे मारण्याची धमकी दिली. या वेळी रामचंद्र नरोटे याने त्याच्या मोबाइलवर वाघमारे हिच्या मोबाइलवर बोलून आपणाविरुद्ध तक्रार केल्यास तुला येथे राहणे अवघड करून टाकू, अशी धमकी दिली. या फिर्यादीनुसार पोलिसांनी दाभाडेसह नाना दाभाडे, राजू शेजूळ, सुभाष शेजूळ, सुधाकर शेजूळ, गणपत शेजूळ, आशा शेजूळ, मीना शेजूळ, कलाबाई दाभाडे, ज्योती दाभाडे, भास्कर जाधव, रामचंद्र नरोटे, लक्ष्मण लव्हाळे आदी २०-२२जणांवर गुन्हा नोंदविला.