माळशिरस तालुक्यातील ठिबक सिंचन अनुदान घोटाळय़ाची कागदपत्रे असलेल्या फायली जळीतप्रकरणी कृषी विभागातील संबंधित तीन अधिकारी व कर्मचाऱ्यांसह सहा वितरकांविरुद्ध अखेर पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, यात कृषी विभागाच्या गोदाम सुरक्षारक्षकाला अटक करण्यात आली आहे.
रवींद्र सीताराम पाटील व रवींद्र बाजीराव कुलकर्णी (रा. पंढरपूर) या अधिकाऱ्यांसह कृषी विभागाचे गोदाम सुरक्षारक्षक सुधाकर धर्मराज नेहतराव (रा. पंढरपूर) तसेच ठिबक सिंचनाचे वितरक सत्यविजय विलास इनामदार, दिगंबर पांडुरंग कदम (रा. अकलूज), धरमचंद माणिकलाल शेंडगे, राजेंद्र वदनवर (दोघे रा. माळशिरस) व संजय पांडुरंग अवताडे (रा.फळवणी, ता. माळशिरस) अशी या गुन्हय़ातील संशयितांची नावे आहेत. यातील गोदाम सुरक्षारक्षक सुधाकर नेहतराव यास अटक करण्यात आली आहे.
माळशिरस तालुक्यातील ठिबक सिंचन अनुदानात १५ कोटी घोटाळा झाला होता. या प्रकरणाची कागदपत्रे असलेल्या फायली पंढरपुरात कृषी विभागाच्या गोदामात ठेवण्यात आल्या असता २२ डिसेंबर २०१३ रोजी मध्यरात्रीच्या सुमारास या फायली जळाल्या होत्या. तथापि, ही जळीत घटना घडल्यानंतर तब्बल आठ दिवसांनंतर याबाबतची माहिती पंढरपूर पोलिसांना कळविण्यात आली होती. मात्र ही जळीत घटना संशयास्पद असल्यामुळे सोलापूर ग्रामीणचे तत्कालीन पोलीस अधीक्षक राजेश प्रधान यांनी या प्रकरणाचा तपास पंढरपूरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रशांत कदम यांच्याकडे सोपविला होता. त्यानुसार तपास होऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्यात आला.