लाखभर घरांची पडझड, हजारो हेक्टर बागा उद्ध्वस्त; जीव वाचला पण संसार उघडय़ावर

हर्षद कशाळकर, लोकसत्ता

अलिबाग :  छप्परं उडालेली घरं, उघडा पडलेला संसार, उद्ध्वस्त बागा, उन्मळून पडलेले वीज खांब, दूरध्वनी यंत्रणा, भिजून कुजलेले धान्य.. चार दिवसांपूर्वी अरबी समुद्रातून येऊन उत्तर महाराष्ट्रमार्गे गेलेल्या निसर्ग चक्रीवादळाने अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, माणगाव, रोहा या रायगड जिल्ह्यातील तालुक्यांमध्ये मोठी हानी केली. या पट्टय़ातील लाखाहून अधिक घरांची पडझड झाल्याने ऐन पावसाळय़ाच्या तोंडावर कुटुंबे उघडय़ावर आली आहेत. संपर्क यंत्रणा ठप्प आणि पाणीपुरवठाही बंद अशा अवस्थेत असलेल्या या तालुक्यांतील अनेक गावांमध्ये अजूनही मदतीचा मागमूस नाही.

२ व ३ जून रोजी आलेल्या या वादळाने रायगड जिल्ह्यातील चार जणांचा बळी घेतला. पण त्यासोबतच हजारो कुटुंबांचे जगणे संकटात आणले. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, माणगाव, रोहा या तालुक्यांतील गावेच्या गावे या वादळाच्या तडाख्यात सापडली. घरांची पडझड, सामानाची नासधूस, अन्नधान्यही भिजले. यामुळे येथे गावागावात हताश आणि हतबल चेहरे पाहायला मिळत आहेत.  शेतकरी आणि बागायतदारांची परिस्थिती फारशी वेगळी नाही. वादळामुळे आंबा, सुपारी, नारळ आणि काजू बागायतदारांचेही अतोनात नुकसान झाल आहे. वाऱ्याच्या दाबाने ६ हजार हेक्टरवरील बागाच्या बागा उद्ध्वस्त केल्या आहेत. पिकती झाडे उन्मळून पडली आहेत. यात नागाव, आक्षी, चौल, रेवदंडा, श्रीवर्धन, हरिहरेश्वर, दिवेआगर, दिघी, मुरुड, काशिद, आगरदांडा परिसरातील बागायतींचा समावेश आहे. शासनाकडून पंचनाम्याची कामे सुरू झाली असली, तरी चौल आणि रेवदंडा परिसरात पंचनाम्यासाठी कोणीच आले नसल्याच्या तक्रारी बागायतदारांकडून केल्या जात आहेत. ‘शासनाने मदत जाहीर केली असली. तरी आमच्यापर्यंत कोणी पोहोचले नाही, पंचनाम्याची कामेही योग्य प्रकारे होताना दिसत नाहीत,’ असे येथील बागायतदार दादाजी सदरे यांनी सांगितले.

आणखी दहा दिवस विजेविना?

जिल्ह्यातील बहुतांश भागात वीजपुरवठा अजूनही खंडित आहे. मनुष्यबळ आणि साधनसामग्री उपलब्ध नसल्याने दुरुस्ती कामांना अजूनही सुरुवात झालेली नाही. शहरी भागात थोडीफार कामे सुरू असली, तरी ग्रामीण भागात महावितरणचे कर्मचारी फिरकलेही नसल्याचे ग्रामस्थ सांगतात. वादळामुळे ३ हजार ५०० उच्चदाब क्षमतेचे खांब, ५ हजार १०० लघुदाब क्षमतेचे खांब आणि २५० रोहित्रांची वादळात मोडतोड झाली आहे. हे सर्व सुरळीत होण्यास अजून दहा दिवस लागतील, असा अंदाज आहे. वीज नसल्याने नळपाणी योजना बंद आहे. त्यामुळे येथे पाणीपुरवठय़ाचेही संकट गडद झाले आहे.

रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्य़ांना १०० कोटी

मुंबई : निसर्ग चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्याप्रमाणेच मोठा फटका बसलेल्या रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी १०० कोटी रूपयांची तातडीची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी जाहीर के ली. नैसर्गिक आपत्तीत दिल्या जाणाऱ्या नुकसानभरपाईचे निकष बदलण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मदत व पुनर्वसन विभागास दिले.

‘वादळानंतर रस्ते वाहतूक सुरळीत करण्यास प्रशासनाने प्राथमिकता दिली होती. ते काम आता पूर्ण झाले आहे. पंचनाम्याची कामेही सुरू आहेत. नागरिकांच्या तक्रारी आहेत. पण येत्या दोन दिवसांत त्या दूर केल्या जातील, त्यांना मदतही दिली जाईल.’

– भरत शितोळे, अप्पर जिल्हाधिकारी रायगड