जिल्हय़ात सुरू झालेल्या संततधार अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना हवालदिल केले आहे. अवर्षणापाठोपाठ गारपीट आणि आता अवकाळीच्या चक्रात शेतकरी अडकला आहे. शनिवारी सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस दुसऱ्या दिवशीही थांबलेला नव्हता. शेतातील उभा गहू, द्राक्षे, डाळिंब, आंब्याचा मोहोर आदीचे नुकसान झाल्याचा अंदाज केला जात आहे. काही ठिकाणची पिके अक्षरश: लोळली आहेत. राहाता, संगमनेर, अकोले परिसरात एक इंचाहून अधिक वृष्टी झाली. नुकसानीची पाहणी करून अहवाल सादर करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी अनिल कवडे यांनी दिल्या आहेत.
जिल्हय़ात सर्वदूर पाऊस सुरू आहे. कालपेक्षा आज पावसाचा जोर अधिक होता. नगर शहरातील अनेक रस्ते जलमय झाले आहेत. महापालिकेने काही रस्त्यांची नुकतीच डागडुजी केली होती. ती उखडली गेली व रस्ते पुन्हा खड्डेमय झाले. शहरात अनेक ठिकाणी रिलायन्स कंपनीची खोदाई सुरू आहे, त्यामुळे रस्ते निसरडे झाले आहेत. आज सकाळी नोंद झालेल्या गेल्या २४ तासांतील पावसाची तालुकानिहाय नोंद अशी (आकडे मिमी.)- अकोले ४३, कोपरगाव २०, संगमनेर ३८, राहाता ३१, राहुरी २७, श्रीरामपूर २४, नेवासे १४, शेवगाव ७, पाथर्डी १०, पारनेर ८, नगर १२, कर्जत ४, श्रीगोंदे ७, जामखेड ३.५, एकूण १७.७५ मिमी.