सीना नदीत उजनी धरणाचे जादा विसर्गाने पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मोहोळ व उत्तर सोलापूर तालुक्यातील सीना नदीकाठच्या शेतकऱ्यांनी सोलापुरात उजनी लाभक्षेत्र प्राधिकरणाच्या कार्यालयात सिंचन भवनात धडक मारून तेथेच ठिय्या आंदोलन केले. या वेळी संतप्त शेतकऱ्यांनी मोहोळचे आमदार प्रा. लक्ष्मण ढोबळे यांच्या साक्षीने सिंचन भवनाची तोडफोड केली. दरम्यान, याप्रकरणी सदर बझार पोलिसांनी आठ जणांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
उजनी धरणातून सीना नदीत ९५९ क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्याचा निर्णय झाला होता. परंतु प्रत्यक्षात पाणी सोडण्यात आले तेव्हा ९५० क्युसेकऐवजी केवळ १५० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात येत असल्यामुळे हे पाणी मोहोळ, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर तालुक्यात पोहोचण्यास विलंब लागणार होता. मोहोळ येथे तर नदीत पाणी पोहोचलेच नव्हते. या प्रश्नावर सीना काठच्या शेतकऱ्यांनी सीनाकाठ शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष नागेश साठे यांच्या नेतृत्वाखाली थेट सिंचन भवनावर धडक मारली आणि तेथेच ठिय्या आंदोलन सुरू केले. सुरूवातीला या आंदोलनाकडे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नव्हते.
तथापि, नंतर उशिरा मोहोळचे राष्ट्रवादीचे आमदार प्रा. लक्ष्मण ढोबळे हे सिंचन भवनात धावून आले. त्यांनी प्रशासनाला जाब विचारला. त्यांचा आक्रमक पवित्रा पाहून चेकाळलेल्या आंदोलक शेतकऱ्यांनी थेट कार्यालयात तोडफोड सुरू केली. यात उजनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय दाभाडे यांच्यासह कार्यकारी अभियंता एन. व्ही. जोशी, उपअभियंता निसार अहमद मुल्ला यांच्या दालनातील फर्निचरचे नुकसान झाले. दरम्यान, कार्यकारी अभियंता जोशी यांनी दिलेल्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
यासंदर्भात बोलताना प्रा. ढोबळे यांनी हा शेतकऱ्यांचा उद्रेक असल्याचे सांगितले.कमी क्युसेक विसर्गाने पाणी सोडल्यामुळे सुरूवातीच्याच तालुक्याला अधिक पाणी मिळते. उर्वरित खालच्या भागातील मोहोळ, उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूर या भागाला पाणी मिळत नाही. त्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्यांना प्रशासनाकडून समाधानकारक उत्तर दिले जात नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या संयमाचा बांध फुटल्याचे त्यांनी नमूद केले. तर प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार उजनी धरणातून सीना नदीत ९५० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्याचा निर्णय शासनाने घेतला होता. परंतु रिधोरे (ता. माढा)येथे बार्शी उपसा सिंचन योजनेचे काम सुरू आहे. पाणी सोडल्यास हे काम थांबेल. त्यामुळे बार्शीचे आमदार तथा सोलापूरचे पालकमंत्री दिलीप सोपल यांनी, पाणी  कमी गतीने सोडल्यास दोन दिवसात काम पूर्ण करता येईल, अशी सूचना केली. त्यानुसार पहिले तीन दिवस अनुक्रमे २००, ३०० व ४५० क्युसेक विसर्गाने सीना नदीत पाणी सोडण्यात आले. शेवटी ९५० क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.