प्रशांत देशमुख 

सावंगी येथील दत्ता मेघे आर्युविज्ञान अभिमत विद्यापीठास तीन विषयांत ‘डॉक्टरेट ऑफ मेडिसिन’ हा अभ्यासक्रम सुरू करण्यास परवानगी मिळाली असून असा अभ्यासक्रम असणारे ते देशातील चौथे महाविद्यालय ठरले आहे. भारतीय वैद्यकीय परिषदेने मेघे विद्यापीठास हे अभ्यासक्रम नुकतेच मंजूर केले आहेत. ‘डॉक्टरेट ऑफ मेडिसिन’ (डीएम) ही पदवी ‘डॉक्टर ऑफ मेडिसिन’ (एमडी) या पदवीपेक्षा उच्चतर आहे. मेघे विद्यापीठास गॅस्ट्रोएन्ट्रॉलॉजी, क्रिटीकल केअर मेडिसिन व इंटरव्हेशनल रेडिओलॉजी या तीन विषयातील डीएम पदवी शिकविण्यास मान्यता मिळाली आहे. या विषयाच्या प्रत्येकी तीन जागा राहतील.

भारतीय वैद्यक परिषदेच्या मार्गदर्शनात चालणाऱ्या इंटरव्हेशनल रेडिओलॉजी विषयातील डीएम पदवीच्या शिक्षणाचे हे देशातील चौथे महाविद्यालय ठरले आहे. दिल्लीची अखिल भारतीय आर्युविज्ञान संस्था, केईएम मुंबई व त्रिवेंद्रम येथील श्री चित्रा इंस्टिट्यूट या अन्य तीन संस्थेतच या पदवी शिक्षणाची सोय आहे. तसेच क्रिटीकल केअरची पदवी देणारी ही मध्य भारतातील पहिली वैद्यकीय संस्था ठरल्याचे विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. राजीव बोरले यांनी सांगितले. संस्थेचा सर्वदूर लौकिक निर्माण करणारी ही घडामोड असल्याचे ते म्हणाले.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या राष्ट्रीय मानांकन संस्थेतर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या अहवालात मेघे विद्यापीठास राज्यात द्वितीय क्रमांक प्राप्त झाला आहे. तसेच याच विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयास देशात २९ वा तर राज्यात दुसरा क्रमांक मिळाला. विद्यापिठाच्या रूग्णालयास कोविड १९ रूग्णालयाचा दर्जा बहाल करण्यात आला असून रूग्णालयात दाखल बहुतांश करोनाबाधित रूग्ण यशस्वी उपचार करून घरी परतल्याचे रूग्णालयाने स्पष्ट केले. भारतीय वैद्यक परिषदेने या संस्थेला न्यूरो सर्जरी सुपर स्पेशॅलिटी पदव्युत्तर अभ्यासक्रमाचीही नुकतीच परवानगी दिली आहे.