सात जणांचे बळी घेणाऱ्या उपद्रवी मृत वाघाचा मेंदू आज हैदराबादच्या सेंटर फॉर सेल्युलर मॉलेक्युलर बॉयोलॉजी प्रयोगशाळेत पाठविण्यात आला. कुत्रा व अन्य जनावरांपासून होणाऱ्या ‘कॅनिन डिस्टेंपर व्हायरसह्णची लागण या वाघाला झाली होती काय, याची तपासणी तेथे होणार आहे.
पोंभूर्णा व परिसरात धुमाकूळ घालणाऱ्या वाघाला डोंगरहळदीत मंगळवारी पोलिस दलाच्या सी-६० व वनखात्याच्या संयुक्त पथकाने गोळ्या घालून ठार केले. लोकप्रतिनिधी, उत्साही वन्यजीवप्रेमी, गावकरी व वन अधिकाऱ्यांनी संयुक्तपणे वाघाला नरभक्षक ठरवून हत्या केल्याची ओरड आता सर्वत्र होत आहे. वाघाच्या हत्येचे प्रकरण अंगलट येत असल्याचे बघून वन अधिकाऱ्यांनी अगदी सावध भूमिका घेतली आहे. त्याचाच एक भाग म्हणून वनाधिकाऱ्यांनी काही वन्यजीवप्रेमींनाही हाताशी धरले आहे. या मोहिमेत सहभागी झालेले वन्यजीवप्रेमी आता वनाधिकाऱ्यांनी लिहून दिलेले संवाद म्हणतांना दिसतात. वाघाला गोळ्या घालताच त्याचे शव रात्रीच चंद्रपूरला आणण्यात आले. वन्यजीवप्रेमी गोंधळ घालण्याची शक्यता पाहून पहाटेच मोहुर्ली येथे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.चित्रा राऊत, वनखात्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.खोब्रागडे, डॉ.कडूकर यांच्या पथकाने वाघाचे शवविच्छेदन केले. यावेळी वाघाचा मेंदू अलग काढण्यात आला. तो आता हैदराबादच्या या प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात आला.
जंगलात कुत्रे व अन्य जनावरांमुळे वाघाला ‘कॅनिन डिस्टेंपर व्हायरस’ ची लागण होण्याची भीती आहे. त्यामुळे वाघाच्या मृत्यूनंतर त्याचा मेंदू हैदराबादला पाठवावा, असे राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण व केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रालयाचे निर्देश होते. त्यामुळे अवघ्या तीन वर्षांच्या नर वाघाचा मेंदू आज डॉ.खोब्रागडे यांनी हैदराबादला पाठवला. त्याचा अहवाल मिळाल्यानंतरच हा व्हायरस होता किंवा नाही, याची माहिती मिळणार आहे. दुसरीकडे, हाच तो उपद्रवी वाघ होता का हे निश्चित करण्यासाठी त्याची डीएनए चाचणी करण्यात येणार असल्याचे डॉ.खोब्रागडे यांनी लोकसत्ताशी बोलताना सांगितले.

बिबटय़ाचा अहवाल अद्याप नाही
गडचिरोली जिल्ह्य़ात धुमाकूळ घालणाऱ्या बिबटय़ाला वनखात्याच्या नेमबाजांनी ठार केले होते. त्याचाही मेंदू हैदराबादलाच पाठविण्यात आलेला होता, परंतु या बिबटय़ाच्या मेंदूचा तपासणी अहवाल अजूनही प्राप्त झालेला नाही. त्यामुळे कुत्र्यांपासून वाघ व बिबटय़ाला कॅनिन डिस्टेंपर व्हायरसची लागण त्याला झाली होती की नाही, हे कळू शकले नाही.