रवींद्र जुनारकर

टाळेबंदीच्या काळात प्रकल्प पूर्णत: बंद असताना ताडोबात वाघीण व तिच्या दोन बछडय़ांचा संशयास्पद मृत्यू आणि सावलीत बिबटय़ाच्या शिकारीच्या घटनेमुळे संरक्षित जंगलात वाघांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. वन खात्याचे अधिकारी पर्यटनाला अधिक महत्त्व देत असल्यामुळे व्याघ्र सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले आहे.  मानव-वन्यजीव संघर्षांत वन्यप्राण्यांवर विषप्रयोगासारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याने व्याघ्र संरक्षण दलाच्या कार्यक्षमतेनर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

जगप्रसिद्ध ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात राज्यातील सर्वाधिक ११५ वाघ व १५१ बिबट आहेत. माया वाघिणीने पाच तथा तारा वाघिणीने तीन अशा आठ पिल्लांना जन्म दिल्याने सर्वत्र या प्रकल्पाचे कौतुक होत असतांनाच १० जून रोजी वाघीण व १४ जून रोजी तिच्या दोन बछडय़ांचे मृतदेह संशयास्पद स्थितीत मिळाले. टाळेबंदीत पर्यटन पूर्णत: बंद होते. वन कर्मचाऱ्यांची उपस्थिती कमी होती, अशा स्थितीत प्रत्यक्ष जंगलात व्याघ्र संरक्षण, गस्त यासारख्या गोष्टींकडे ताडोबा व्यवस्थापनाने लक्ष देणे आवश्यक होते. मात्र ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांनी याकडे दुर्लक्ष केले. याउलट ताडोबाचे ऑनलाइन दर्शन घडविण्यासाठी वाट्टेल तो खटाटोप केला. दररोज वन अधिकारी व कर्मचाऱ्यांना चित्रीकरणात गुंतविले, त्याच्या ऑनलाइन चित्रफिती तयार केल्या. हे सर्व करतांना व्याघ्र सुरक्षेकडे दुर्लक्ष झाले. परिणामी मोहर्ली वनपरिक्षेत्र कार्यालयापासून  तीन कि.मी.अंतरावर वाघीण व तिच्या दोन छाव्यांचा मृतदेह चार दिवसांच्या अंतराने मिळाला. वाघिणीचा मृत्यू झाल्यानंतर ताडोबा व्यवस्थापनाला ही माहिती चार ते पाच दिवसांनी मिळाली. पर्यटन सुरू असतांना वाघांच्या मृत्यूची बाब आजवर लपून राहिली नाही.

सुरक्षेत त्रुटी?

टाळेबंदीत प्रथमच अशा पद्धतीने ताडोबाच्या अधिकाऱ्यांना उशिराने माहिती मिळाली. वन्यजीवप्रेमींच्या मते, ताडोबात टाळेबंदीत मागील तीन महिन्यांपासून व्याघ्र सुरक्षा दलाची पाहणी योग्य पध्दतीने होत नव्हती. नियमित होणारी गस्त, वन कर्मचारी देखील जंगलात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कर्तव्य बजावत नव्हते. त्याचाच परिणाम वाघीण व तिच्या दोन बछडय़ांवर विषप्रयोगाने झाला आहे. याला ताडोबा व्यवस्थापन जबाबदार असल्याचा आरोप वन्यजीव प्रेमी करीत आहेत. विशेष म्हणजे, अशा घटनांवर आळा घालण्यासाठी ताडोबाचे क्षेत्र संचालक एन.आर.प्रवीण यांनी काही महिन्यांपूर्वीच मानव-वन्यजीव संघर्ष असलेल्या ७५ गावांमध्ये ग्रामस्थांचे विशेष व्याघ्र संरक्षण दल तयार केले होते. या सर्वाना आगरझरी येथे प्रशिक्षण देण्यात आले होते. तसेच त्यांना मानधनदेखील देण्यात येणार आहे. या संरक्षण दलात गावातील तरुण मुले, पोलीसपाटील यांचा समावेश आहे. अशा पद्धतीने ग्राम संरक्षण दलानंतरही शिकारीच्या घटना कमी झालेल्या नाहीत. तेव्हा  वन विभाग संरक्षणात कमी पडत आहे अशीही टीका आता व्हायला लागली आहे. सावलीच्या बिबट शिकार प्रकरणात तर ग्रामस्थ रानडुकराची शिकार करण्यासाठी गेले होते. त्यात बिबट अडकून मृत पावला. याचाच अर्थ आजही ग्रामस्थ शिकार करीत आहेत.  त्यांना शिकारीपासून परावृत्त करण्याऐवजी वन विभाग पर्यटनविकासात गुंतला असल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. तेव्हा पर्यटन सोडून वन खात्याला सुरक्षेकडे अधिक लक्ष केंद्रित करणे गरजेचे आहे.

सीतारामपेठ येथे घडलेली वाघीण व बछडय़ांच्या मृत्यूची घटना टाळण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे. वन खात्याला गावागावात माहिती देणारे जाळे अधिक मजबूत करणे गरजेचे आहे. वन्यजीव अभ्यासक बंडू धोतरे यांनी पोलीसपाटलाच्या धर्तीवर वनपाटील नियुक्त करण्याची मागणी केली होती. या घटना टाळण्यासाठी अशा वनपाटलांच्या नियुक्त्या तात्काळ कराव्यात. ग्रामस्थांना निर्णय प्रक्रियेत सामावून घ्यावे, त्यांना उदरनिर्वाहासाठी पैसे द्यावेत, गावात दक्षता समिती स्थापन करावी.

-प्रा. योगेश दुधपचारे, वन्यजीव अभ्यासक.

वाघीण व तिच्या छाव्यांवर पाण्यातून विषप्रयोग झाले असण्याची शक्यता आहे. जिथे ही घटना घडली तिथे एक तळे आहे. तिथे दोन माकडांचे मृतदेह देखील मिळाले आहेत. आम्ही या संपूर्ण प्रकरणाचा शोध घेत आहोत. चौकशीअंती मृत्यूचे कारण सांगता येईल.

-एन. आर. प्रवीण, मुख्य वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक, ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्प.