मनसेचे नेते राज ठाकरे देशातल्या अनेक नेत्यांप्रमाणे मलाही भेटले. त्यांना आघाडीत घ्यायचे की नाही याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटले आहे. पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राज्यात काही महिन्यात विधानसभा निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात २४० जागांवर चर्चा झाली. उर्वरित जागांसाठी घटकपक्षांसोबत चर्चा केली जाईल असेही शरद पवार यांनी सांगितले. तसेच लवकर यासंदर्भातली घोषणा करु असेही त्यांनी स्पष्ट केले.

मनसेला सोबत घ्यायचे की नाही हा निर्णय अद्याप व्हायचा आहे असे पवार यांनी सांगितले. महाराष्ट्रातली विधानसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या अन्यथा बहिष्कार घालू अशी भूमिका मनसेने घेतली आहे. ती मला मान्य नाही असे शरद पवार यांनी म्हटले आहे. बॅलेट पेपरच्या मागणीसाठी देशभरातील अनेक पक्षांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे असेही त्यांनी स्पष्ट केले.

शिवेंद्रसिंहराजे म्हणाले मी पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाणार नाही
कालच माझ्याकडे शिवेंद्रसिंहराजे दीड तास बसले होते. मी पक्षाच्या चौकटीच्या बाहेर जाणार नसल्याचे त्यांनी सांगितले. तर आमदार संग्राम जगताप आणि राहुल जगताप यांचा देखील आजच सकाळी फोन आला होता. दोघांनी पक्ष सोडणार नसल्याचं सांगितले आहे. आमच्याविषयी अफवा पसरवल्या जात आहे.

विद्यामान जागा ठेवणे हाच आघाडीचा धर्म 
काँग्रेस पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी लोकसभेला आम्ही आघाडीचा धर्म पाळला आता विधानसभेला राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळावा अशी भूमिका मांडली आहे. त्यावर शरद पवार म्हणाले की, आम्ही आघाडीचा धर्म पाळतच आहोत. यात ज्याच्या विद्यमान जागा आहेत या जागा त्या त्या पक्षाला तशाच ठेवायच्या असतात आणि त्यातील काही जागा इकडे तिकडे होऊ शकतात. कोणती जागा सुटणार कोणती नाही ते दोन्ही पक्षचे नेते ठरवतील असे त्यांनी सांगितले.

वैभव पिचड पाच वर्ष विरोधी पक्षनेते असताना, निधीचा प्रश्न येत नव्हता 

वैभव पिचड यांनी भाजपामध्ये जाण्याचा निर्णय घेतला याबाबत बोलताना ते म्हणाले, पिचड यांनी मला सांगितले मी माझ्या मतदार संघातील विकासाच्या दृष्टीने निधी मिळण्यासाठी निर्णय घेत आहे.  खरे तर ते पाच वर्षे विरोधी पक्षनेते असताना. त्यावेळी आमचे सरकार होते परंतु त्यावेळी निधीचा प्रश्न येत नव्हता. पण आता आलेल्या परिस्थितीला जिद्दीने तोंड देण्यास आमचे कार्यकर्ते तयार आहेत