दरवाढीची भीती; ऑक्टोबरमध्ये टंचाईची शक्यता

अनिकेत साठे, नाशिक

राज्यासह देशातील अनेक भागास सध्या पूरस्थितीला तोंड द्यावे लागत आहे. कृषिमालाचे प्रचंड नुकसान झाले. याचा फटका खरीप कांद्यालाही बसला. तो बाजारात येण्यास विलंब होईल. या स्थितीत उन्हाळ कांद्याचे दर उंचावत आहेत. काही दिवसांत त्यात प्रतिक्विंटलला ३०० रुपयांनी वाढ झाली. सरासरी १६७० रुपयांवर दर पोहोचले. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाव ६०० ते ७०० रुपयांनी अधिक आहेत. ऑक्टोबर, नोव्हेंबरमध्ये टंचाई निर्माण होऊन ते आणखी वधारतील, असा या क्षेत्रातील जाणकारांचा अंदाज आहे.

शेतकरी, व्यापाऱ्यांनी चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा सध्या घाऊक बाजारात विक्रीस येत आहे. त्याची आवक कमी आहे. कांद्याच्या सर्वात मोठय़ा लासलगाव बाजार समितीत जुलैमध्ये दैनंदिन साधारणपणे २२ ते २३ हजार क्विंटलची आवक झाली. त्यात आता दोन ते तीन हजारचा फरक पडला आहे. अतिवृष्टीत इतर भागातील कांद्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्याचे पडसाद बाजारात उमटत आहेत. बुधवारी लासलगाव बाजार समितीत कांद्यास प्रतिक्विंटल सरासरी १६७० रुपये भाव मिळाला. गतवर्षी ऑगस्टमध्ये सरासरी दर ९७१ रुपये होते. उन्हाळ कांद्यातून शेतकरी वर्गास चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असते. मार्च ते मे या कालावधीत त्याचे उत्पादन घेतल्यानंतर पाच-सहा महिने नवा कांदा येत नाही. या काळात चांगली निर्यात झाली, देशांतर्गत बाजारात मागणी वाढल्यास दर उंचावतात. अशी अनेक उदाहरणे आहेत. या अपेक्षेने उन्हाळ कांदा पिकविणाऱ्यांचे काही वर्षांत मात्र हात पोळले गेले. उन्हाळ कांद्याचे आयुर्मान अधिक असते. तो चाळीत साठवून दराची प्रतीक्षा करता येते. यामध्ये खर्च वाढतो, साठवणुकीत वजन कमी होते. पावसाळी वातावरणात तो खराब होण्याची शक्यता असते. याचा हिशेब केल्यानंतर हाती काही पडत नसल्याचे उत्पादक सांगतात.

लासलगाव बाजार समितीचे सचिव नरेंद्र वाढवणे यांच्या मते पुढील काळात कांदा दर उंचावतील, मात्र ते गगनाला भिडणार नाहीत. पावसामुळे नव्या खरीप कांद्याची लागवड लांबली. यामुळे बाजारात तो येण्यास विलंब होणार आहे. पावसात कांदा रोपांचे नुकसान झाले. त्यांची पुनर्लागवड करावी लागली. सध्याच्या वातावरणात चाळीत साठविलेला उन्हाळ कांदा खराब होत आहे. प्रोत्साहन अनुदान रद्द झाल्यामुळे निर्यातीचे प्रमाणही घटले. यामुळे देशांतर्गत बाजारात पुरेसा कांदा उपलब्ध राहील, असा अंदाज वाढवणे यांनी व्यक्त केला. मागील पाच वर्षांतील ऑगस्ट महिन्यातील आकडेवारी पाहिल्यास कांदा दरातील चढ-उतार लक्षात येतात. २०१५ मध्ये ऑगस्ट महिन्यात कांद्यास सरासरी ३७८६ रुपये भाव मिळाला होता. पुढील वर्षांत तो ६७६ रुपयांपर्यंत गडगडला. ऑगस्ट २०१७ मध्ये हे दर १७६४ रुपये होते. गेल्या वर्षी पुन्हा घट होऊन ते ९७१ रुपयांवर आले. सद्य:स्थितीत नाशिकमधून दररोज १० ते १५ कंटेनर कांदा परदेशात पाठविला जात आहे. प्रोत्साहन अनुदान काढून घेतल्यानंतरही निर्यात सुरू असल्याचा दाखला काही तज्ज्ञ देतात. खरीप कांद्यास विलंब होणार असल्याने पुढील काळात उन्हाळ कांदा भाव खाईल, अशी उत्पादकांना आशा आहे.

सध्या मध्य प्रदेशसह इतर भागांतून देशातील बाजारात कांदा पाठविला जात आहे. नाशिकमधून कांद्याची निर्यात सुरू आहे. पावसामुळे खरीप कांद्याचे उत्पादन लांबणीवर पडले. यामुळे ऑक्टोबरमध्ये देशात कांद्याची कमतरता भासेल. तेव्हा भाव आणखी वाढतील. मात्र, तोपर्यंत चाळीत साठविलेला ३० टक्क्य़ांहून अधिक कांदा खराब झालेला असेल. म्हणजे भाव वाढले तरी शेतकऱ्याला लाभ होणार नाही.

– चांगदेवराव होळकर (माजी उपाध्यक्ष, नाफेड)