बाबा रामदेव यांच्या उद्योग समूहाचे स्वामी बालकृष्ण यांनी हेटीकुंडी गौळाऊ प्रकल्पावर भेट दिल्यानंतर देशातील एकमेव अशा या गौळाऊ संगोपन केंद्राचे संभाव्य खासगीकरण स्थानिक पशुपालकांत अस्वस्थतेचे कारण ठरत आहे. बाबा रामदेव यांच्या अन्नप्रक्रिया उद्योगाच्या विदर्भातील नियोजित साम्राज्यात आता कारंजा तालुक्यातील हेटीकुंडी गौळाऊ प्रकल्पाची भर पडण्याची स्पष्ट चिन्हे उमटत आहे. ब्रिटिशांनी १९४६ साली स्थापन केलेले व सध्या पशुसंवर्धन विभागाचा ताबा असलेले हे केंद्र दुर्मीळ होत चाललेल्या गौळाऊ गाईंचे एकमेव असे केंद्र आहे. पुराणात उल्लेख झालेल्या गौळाऊ गाईंची वंशपरंपरा या ठिकाणी महत्प्रयासाने जतन होत आहे. सध्या केवळ ११३ गौळाऊ जनावरे शिल्लक आहेत.

याच केंद्राचे पुनरुज्जीवन खासगीकरणातून करण्याचे घाटत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी हे केंद्र पतंजली उद्योग समूहाच्या स्वाधीन करण्याची विनंती महिन्याभरापूर्वी मुख्यमंत्र्यांना केली होती. ८०० एकर जमिनीवर राज्य शासनाने २५ हजार कोटी रुपयांचा निधी उभा करीत प्रकल्प साकारावा. त्याची पुढील अंमलबजावणी पतंजली उद्योग समूहामार्फत व्हावी, अशी गडकरींची सूचना होती. या जागेवर पतंजली १० हजार गाईंची खरेदी करीत संवर्धन केंद्र, डेअरी व तत्सम उपक्रम करण्याचे सुतोवाच झाले.

हेटीकुंडी केंद्राकडे ३२८ हेक्टर जमीन होती. वनविभागास काही जमीन सुपूर्द केल्यानंतर केंद्राकडे ४० एकर शिल्लक राहिली. अद्याप गौळाऊचे संवर्धन व प्रजननाचे काम या ठिकाणी होत आहे. उच्च प्रतीचे वळू उपलब्ध झाले. दुर्मीळ होत चाललेल्या गौळाऊसाठी हेच केंद्र आधार आहे. २००५ साली हे केंद्र टप्प्या टप्प्याने बंद करण्याचा निर्णय झाला होता. परंतु स्थानिकांच्या विरोधाने निर्णय मागे घेण्यात आला. पुढे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आर्वी दौऱ्यावर असताना झालेल्या सभेत हेटीकुंडी केंद्राचा प्रश्न ठेवला गेला. मंजूर १८ कोटी रुपयांचा निधी त्वरित देण्याची हमी त्यांनी दिली.

आता पतंजलीची पावले पडू लागल्याने हे केंद्र परत चर्चेत आले आहे. चार दिवसांपूर्वी पतंजलीचे सर्वेसर्वा स्वामी बालकृष्ण, पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर व खात्याचे वरिष्ठ हे केंद्र पाहण्यास येऊन गेले. यात काय निर्णय झाले, हे पुढे आले नाही. मात्र, केंद्राचे खासगीकरण होणार हे निश्चित झाल्याची चर्चा परिसरात पसरली.

कारंजा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष नितीन दर्यापूरकर यांनीही पतंजलीच्या आक्रमणानंतर गौळाऊची ओळख टिकणार काय, असा सवाल उपस्थित केला. विशेष बाब म्हणजे गत आठवडय़ात जिल्हा परिषदेच्या सभेत हे केंद्र जिल्हय़ातील संस्थेकडेच असावे, अशी आग्रही भूमिका रिपाइं नेते व जि.प. सदस्य विजय आगलावे यांनी मांडली. परंतु या केंद्राचा ताबा राज्य शासनाकडे असल्याने वर्धा जि.प. केवळ शिफारस करू शकते, अशी भूमिका पुढे आली. केंद्राचे खासगीकरण नको. पतंजलीकडे तर मुळीच देऊ नये. कारण प्रश्न अस्मितेचा आहे. गौळाऊ हे वर्धा जिल्हय़ाचे वैभव आहे. ते अन्यत्र सोपवू नये.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. राजीव भोजने यांना विचारणा केल्यावर त्यांनी बालकृष्ण यांची भेट झाल्याचे व त्यांची भूमिका सकारात्मक असल्याचे मान्य केले. सध्याच याविषयी काही करार झाल्याची माहिती नाही. हेटीकुंडी केंद्र सुरळीत असून गौळावू गाईंची देखभाल कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या जबाबदारीवर सुरू आहे.

गौळाऊच्या संवर्धनात लुडबुड नकोच

बाबा लोकांकडे या गायी सोपविण्याचा प्रकार दुर्दैवी आहे. गौळाऊ गाईंचे जतन नफेखोर पतंजली कसे करणार, हा प्रश्नच आहे. श्रीकृष्णाची कामधेनू असलेल्या गौळाऊची खरी ओळख या परिसरातील गवळी समाजासच आहे. आजही या गाईंच्या तुपाचा हजार ते बाराशे रुपये किलो असा भाव असून आयुर्वेदिक उपचारात या तुपास सर्वोच्च प्रधान्य मिळते. बाहेरच्या लोकांचा येथील हस्तक्षेप खपवून घेतला जाणार नाही. कंपनीच्या ताब्यात हे केंद्र गेल्यास गवळी समाजाने कोणाकडे हात पसरायचे, याचे उत्तर कोण देणार. गौळाऊच्या संवर्धनात कंपनी, राजकारणी यांची लुडबुड नकोच.   – मेघराज चौधरी, सभापती, कारंजा पंचायत समिती