राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. छगन भुजबळ हे देवेंद्र फडणवीस यांच्या सागर या निवासस्थानी भेटीसाठी पोहोचले होते. या भेटीबाबतही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभेत खुलासा केला.

“परवा माझ्याकडे माननीय भुजबळ साहेब आले होते. मी त्यांना सांगितलं आमच्यासाठी हा राजकीय विषय नाही. आम्ही तुम्हाला मदत करतो. तुमच्या नेतृत्वात करू. आम्हाला ओबीसींचं आरक्षण परत मिळालं पाहीजे. तुम्ही बैठक बोलवा, त्या बैठकीला येऊन मी काय हवं ते सांगतो. सरकारची नियत जर साफ असेल तर केंद्र सरकारकडे बोटं दाखवण्याऐवजी सरकार स्वत:ची जबाबदारी पार पाडावी. मला जे काही वाटतंय त्याबद्दल त्यासंदर्भात नोटदेखील करुन देण्यास तयार आहे. आपण एकत्रितपणे काम करु, त्यात काही अडचण नाही.” असं देवेंद्र फडणवीस यांनी सभेत सांगितलं.

“ठाकरे सरकारमध्ये नेते कमी आणि बोलके पोपट जास्त”; ओबीसी आरक्षणावरुन फडणवीसांची जोरदार टीका

“विधानसभेत ठराव पास केला जातो, की केंद्र सरकारने आम्हाला सेन्सस डेटा उपलब्ध करून द्यावा. हे षडयंत्र आहे. ६० ते ७० टक्के स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या फेब्रुवारीत येणार आहेत. फेब्रुवारीपर्यंत टाईमपास करायचा. फेब्रुवारीला या निवडणुका संपल्या की, पुढची सात वर्षे ओबीसी आरक्षण देऊनही फायदा नाही. त्या आरक्षणाचा लाभच मिळणार नाही. म्हणून केंद्राने डेटा द्यावा, असं रोज त्या ठिकाणी बोललं जात आहे. मी संन्यास घेईन ये मी जाणीवपूर्वक बोललो. पुढची २५ वर्षे मला भारतीय जनता पक्षात काम करायचं आहे. तरी मी जबाबदारीने बोललो कारण मला माहिती आहे, हे आरक्षण दिलं जाऊ शकतं. ओबीसींचं आरक्षण रद्द झालेलं नाही. केवळ इम्पेरिकल डेटा सादर न केल्याने ओबीसींचं महाराष्ट्रातील आरक्षण स्थगित करण्यात आलं आहे. देशातलं आरक्षण रद्द झालेलं नाही. केवळ महाराष्ट्राचं आरक्षण रद्द झालेलं आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे झालं आहे.” अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी सभेत केली.

“दलित, ओबीसी, महिला मंत्री झाल्याने विरोधक आनंदी नाहीत”; अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मोदींची टीका

राज्य सरकारवर टीका करताना त्यांनी मोदी सरकारची स्तुतीही केली. देशाच्या केंद्रीय मंत्रिमंडळात सर्वाधिक मंत्री हे ओबीसी समाजाचे आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. देशात मोदींच्या नेतृत्वाखाली बहुजनांचं राज्य आहे, असं त्यांनी यावेळी सांगितलं. ओबीसीची खरा पक्ष हा भारतीय जनता पक्ष आहे, हे सांगायला देखील ते विसरले नाहीत. ओबीसींना संविधानात स्थान देण्याचं काम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली झाल्याचं देखील त्यांनी सांगितलं. मुंबई येथे आयोजित भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश कार्यकारिणी बैठकीत माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आशीष शेलार, मंगल प्रभात लोढा, खा. संगम लाल गुप्ता, डॉ. संजय कुटे, अतुल भातखळकर, योगेश टिळेकर उपस्थित होते.