देवगड हापूससह आंब्यांची आवक वाढली

फळांचा राजा आंबा बाजारपेठांमध्ये मोठय़ा प्रमाणात दाखल होऊ लागला आहे. कोकणची भारी ओळख सांगणारा देवगड व रत्नागिरी हापूस या खेपेस लवकर आवक झाला असून, हापूसचा दर सध्या जरा कडकच असला, तरी हंगामाचा उर्वरित कालावधी आणि झाडांना लगडलेल्या आंब्यांचे चित्र पाहता, निसर्गाने साथ दिल्यास सर्वसामान्यांना आंब्याचा स्वाद निश्चित स्वस्तात मस्त राहणार असल्याचे आंब्याचे ठोकळ विक्रेते सांगत आहेत.

सध्या उच्च प्रतिचा मोठा देवगड हापूस ६०० ते ८०० रुपये डझन असे हे भारी फळ आंबा शौकिनांला भुरळ घालत आहे. दरम्यान, दिवसेंदिवस आंब्याची आवक वाढत असल्याने अन्य फळांना मागणी कमी राहू लागली आहे. ढगाळ वातावरण, वारा-वादळ व पावसाचा तडाखा न बसल्यास आंब्याची मोठी आवक अपेक्षित मानली जात आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राचा दुवा ठरलेल्या कराडच्या बाजारपेठेत मुंबई पाठोपाठ कोकणच्या नामी भारी आंब्याची आवक होत असते. उन्हाचा कडाका वाढताच बाजारात आंबाही दाखल होतो. यंदा मात्र, उन्हाचा कडाका व फळांच्या या राजाचे तुलनेत लवकर आगमन झाले आहे. घरात अढी लावून पिकवावयाचा कच्चा हापूस आंबाही सध्या मोठय़ा प्रमाणात विक्रीस आला आहे. या आंब्याचा दर शेकडा २,००० ते २,८०० रुपये असून, हंगाम सरतेवेळी हा दर निम्म्यापेक्षाही कमी येईल अशी आवक अपेक्षित आहे. पिकलेला हापूस आंबा सर्वसाधारण फळ सध्या ४०० ते ६०० रुपये डझन दराने विक्री होत आहे. गतवर्षी देवगड हापूसचा हाच दर ६०० ते १,००० रुपयांच्या घरात होता. सध्या देवगड व रत्नागिरी हापूस एकत्रित करून खवय्यांची दिशाभूल होत असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. हापूसचा हा दरही खाली येणे अपेक्षित आहे. सातारा जिल्ह्यात रायवळ आंब्याची मोठय़ाप्रमाणात झाडे आहेत. यंदा उन्हाचा तडाखा असतानाही बऱ्यापैकी मोहोर टिकून रायवळ आंब्याची आवकही तुलनेत जादाचीच होईल . नजीकच्या काळात कोकण व कर्नाटकसह अन्य राज्यातून मोठय़ा प्रमाणात आंब्याची आवक अपेक्षित आहे. आमरसासाठीचा पायरी, लोणच्यासाठीचा कच्चा कडक आंबा, चोखून खाण्याचा केसरी आंबाही समाधानकारक प्रमाणात दाखल होण्याची चिन्हे आहेत.  कर्नाटकी व अन्य प्रकारचा आंबा देवगड व हापूस आंबा असल्याचे सांगून फसवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. यावर कर्नाटकी आंबा हा रंगाने पिवळाधम्मक तर, आकाराने कोयरी ऐवजी गोलाकार असतो व देठ जाड राहताना, त्याचा गंध मर्यादित असतो. मात्र, देवगड हापूसला रंग पिवळसर आणि काहीसा हिरवा राहताना, त्याचा आकार बऱ्यापैकी कोयरीसारखा राहताना देठ लहान तर तोंड निमुळते असते. त्याचा गंध अस्सल आंब्याचा राहताना गर केशरी आणि पिकल्यावर हे फळ सुरकुतले जाते. उग्र वास आणि सुरकुत्या पडलेला देवगड खूपच चवदार व गोड असतो. तरी, खवय्यांनी याबाबी तपासून आंबा खरेदी केल्यास त्यांची देवगड म्हणून कर्नाटकी आंबा घेण्याची फसवणूक टळणार आहे.

याचबरोबर रासायनिक प्रक्रियेद्वारे पिकवलेला निकृष्ट दर्जाचा आंबाही विकला जातो. हा आंबा चकचकीत दिसतो आणि पिवळा गर्द रंग राहताना जिथे रसायन कमी पडते, तिथे तो काहीसा हिरवा राहतो. यावरून ही फसवेगिरी ओळखता येते.