कोल्हापुरात लोकसभा निवडणुकीत आपण राष्ट्रवादीकडून दुसऱ्यांदा खासदार होण्यासाठी उभा राहिलेलो असताना पक्षाचे नेते शरद पवार यांनी आपल्या विजयासाठी जातीने लक्ष घातले. मात्र आघाडीतील अन्य स्वकियांनीच दगा दिल्यामुळे आपणांस पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळेच आपण भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे माजी खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.

सोलापुरात रविवारी सायंकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दुसऱ्या टप्प्यातील महाजनादेश यात्रेचा समारोप भाजपचे अध्यक्ष, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असताना त्याचे औचित्य साधून राष्ट्रवादीचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश घेण्यासाठी महाडिक हे आले होते. त्या वेळी पक्षांतराविषयी स्वत:ची भूमिका मांडताना ते म्हणाले, २०१४ साली आपण कोल्हापूर लोकसभा निवडणुकीत निवडून येऊन खासदार झालो होतो. शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षात बरीच कामे केली होती. लोकसभेला दुसऱ्यांदा उभा राहिलो तेव्हा शरद पवार, अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांनी आपणांस मोठी मदत केली होती. पवार यांनी जातीने लक्ष देऊन आपणांस निवडून आणण्यासाठी प्रयत्न केले. परंतु त्याचा उपयोग झाला नाही. कारण स्वकियांनीच दगा दिला. त्यामुळेच आपण भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. संपूर्ण देश आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कामाने प्रभावित आहे. महाराष्ट्रात देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कारभारावर जनता समाधानी आहे. कोल्हापूर भागातील आपल्या कार्यकर्त्यांची कामे होतील म्हणून आपण भाजपमध्ये जात आहोत, असे त्यांनी सांगितले. या वेळी शासकीय विश्रामगृहात धनंजय महाडिक यांनी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची भेट घेतली.