ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू यांचं वयाच्या ९२ व्या वर्षी निधन झालं आहे. नाट्य आणि सिनेसृष्टीची कधीही न भरुन येणारी हानी झाली आहे. एक नाट्यपर्व अस्ताला गेल्याची भावना विविध मान्यवरांकडून व्यक्त केली जाते आहे. सामाजिक आणि वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी असा श्रीराम लागू यांचा लौकिक होता. त्यांना अनेक मान्यवरांनी आदरांजली वाहिली आहे

शरद पवार
वैचारिक भान असलेले प्रयोगशील रंगकर्मी म्हणून डॉ. लागू यांचा कलाक्षेत्रावर प्रभाव आहे. जुन्या जाणत्यांपासून ते होतकरु कलावंतांपर्यंत सगळ्यांनाच त्यांचा आधार वाटत असे. त्यांच्या निधनाने महाराष्ट्र एका प्रतिभासंपन्न अभिनेत्याला पारखा झाला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली असं ट्विट राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी केलं आहे.

अशोक चव्हाण

नटसम्राटांच्या जाण्याने आज कदाचित मृत्यूही ओशाळला असेल. पण चाहत्यांच्या मनातील सिंहासनावर ते कायम आरूढ राहतील, या शब्दांत त्यांनी डॉ. लागू यांना श्रद्धांजली अर्पण केली.

देवेंद्र फडणवीस
विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीही डॉ. लागू यांना आदरांजली वाहिली आहे. अभिनय क्षेत्राव्यतिरिक्त अंधश्रद्धा निर्मुलनासह अनेक सामाजिक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. अण्णा हजारे यांच्या लढ्यातही त्यांचा वाटा होता. मराठीसोबतच हिंदी सिनेसृष्टीही त्यांनी गाजवली. त्यांच्या असंख्य चाहत्यांच्या, आप्तस्वकियांच्या कुटुबीयांच्या दुःखात मी सहभागी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो असे फडणवीस यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे

नितीन गडकरी
ज्येष्ठ अभिनेते श्रीराम लागू यांच्या निधनाने मराठी नाट्यसृष्टीचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे. पिंजरा, सामना यांसारखे चित्रपट आणि नटसम्राट, हिमालयाची सावली यांसारख्या अजरामर नाटकांमधून त्यांनी मराठी चित्रपट-नाट्यसृष्टी जीवंत केली. माझी डॉ लागू यांना विनम्र श्रद्धांजली.