औरंगाबाद पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीचे उमेदवार सतीश चव्हाण हे थेट सिंचन घोटाळय़ाशी जोडले गेलेले व्यक्तिमत्त्व आहे. त्यांनी मनीषा इन्फ्रास्ट्रक्चरबरोबर आपला काय संबंध आहे, हे जाहीर करावे. सिंचन घोटाळा रोखण्यासाठी काही प्रयत्न केले का? केले असतील तर ते नेमके कोणते, या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, असे आव्हान भाजपचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी दिले. सिंचन प्रकल्पांची अवाजवी, अवास्तव किमत जोडून सिंचन घोटाळय़ात चव्हाण यांचा सहभाग असल्याचा आरोप भंडारी यांनी केला. औरंगाबाद येथे रविवारी ते पत्रकार बैठकीत बोलत होते.
पदवीधर मतदारसंघात भाजपचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्यावर असणाऱ्या कंडोम घोटाळय़ाच्या आरोपाचा खुलासाही त्यांनी एका पत्राद्वारे केला. हे पत्र राज्य गुन्हे अन्वेषण शाखेचे उपअधीक्षक व तपास अधिकारी अरुण बस्ते यांच्या सहीचे आहे. या पत्रान्वये देवगिरी लॅटेक्स या कंपनीच्या विरोधात कोणतेही पुरावे आढळून आले नाहीत. तसेच या कंपनीच्या संचालकांवर न्यायालयात दोषारोपही दाखल केले नसल्याचे म्हटले आहे. १९ जून २०१० रोजीच्या या पत्रामुळे शिरीष बोराळकर यांच्यावर होणारे आरोप निराधार आणि खोटे असल्याचे भंडारी यांनी म्हटले.
सिंचन घोटाळय़ात राष्ट्रवादीचे पदवीधर मतदारसंघाचे उमेदवार सतीश चव्हाण यांचा थेट संबंध असल्याचा आरोप करत त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, केंद्रीय गुन्हा अन्वेषण विभागाचे महासंचालक यांसह विविध अधिकाऱ्यांना शरद कुलकर्णी यांनी पाठविलेल्या तक्रारीच्या प्रतीही दिल्या. या तक्रारी २००८ मधील आहेत. सिंचन घोटाळय़ात अडकलेल्या उमेदवाराला पसंती द्यायची की नाही, हे मतदार ठरवतीलच, असे सांगताना भंडारी म्हणाले, की लोकसभा निवडणुकीच्या वेळी भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या विरोधात आमदार सतीश चव्हाण यांनी हीन दर्जाचे राजकारण केले होते. या पत्रकार बैठकीस भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष बबनराव लोणीकर यांनी मराठवाडय़ातील बॅरेजेसमधील मूळ किंमत आणि सुधारित किमतीचा आढावा घेत सिंचन घोटाळा कसा झाला व त्यास उपमुख्यमंत्री अजित पवार कसे जबाबदार आहेत, हे सांगितले.