यवतमाळ जिल्ह्यात दारूबंदीचे आव्हान कायम

नितीन पखाले, लोकसत्ता

यवतमाळ : राज्य मंत्रिमंडळाने गुरुवारी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी हटवण्याचा निर्णय घेतला. या अनुषंगाने पाच वर्षांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यवतमाळच्या दारूबंदीबाबत विधानसभेत केलेल्या भाषणास पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे.

२००९ ते २०१४ या कालावधीत राज्यात आघाडीचे सरकार असताना चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी आंदोलनांची दखल घेत चंद्रपूरचे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज्यात भाजपचे सरकार सत्तेत येताच चंद्रपूरमध्ये दारूबंदी करण्याचा शब्द दिला होता. २०१४ मध्ये सत्तांतर होऊन राज्यात भाजप, सेनेचे सरकार आले. त्यावेळी पहिल्याच अर्थसंकल्पात तत्कालीन अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय जाहीर केला व शब्द पाळला. १ एप्रिल २०१५ पासून तिथे दारूबंदी झाली. दारूमुळे सुरू असलेल्या या जिल्ह्यातील अर्थकारणाची दिशाही बदलली. तेथील दारूबंदीमुळे अनेक दारू, बार परवानाधारकांनी आपले परवाने इतरत्र हलवले. त्यांची पहिली पसंती यवतमाळ होती. चंद्रपूरच्या दारूबंदीमुळे यवतमाळ जिल्ह्यात दारू विक्रीतून महसूल वाढला, सोबतच अवैध दारू विक्रीचे प्रकारही मोठय़ा प्रमाणात वाढले.

विदर्भातील वर्धा, गडचिरोली, चंद्रपूरप्रमाणे यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदी व्हावी, यासाठी जिल्ह्यातील विविध सामाजिक, महिला संघटनांनी पुढाकार घेतला. स्वामिनी दारूबंदी आंदोलन उभे राहिले. या आंदोलनाचे संयोजक महेश पवार यांच्या नेतृत्वात सर्वपक्षीय नेत्यांना यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदीबाबत मागणी करण्यात आली.

जिल्ह्यातील महिला बचत गटांसह ग्रामपंचायतीत ठराव घेतले जाऊ लागले. तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड, मदन येरावार यांच्या घरावर दारूबंदीसाठी मोर्चे काढले. तेव्हा संजय राठोड यांनी दारूबंदीबाबत सकारात्मक निर्णय घेण्याची ग्वाही दिली होती. त्यामुळे राजकीय, प्रशासकीय स्तरावर या आंदोलनांची काही प्रमाणात दखल घेतली गेली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील व खा. सुप्रिया सुळे या संघर्ष यात्रेनिमित्त यवतमाळात आले असताना स्वामिनी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेऊन जिल्ह्यात दारूबंदी करण्याची मागणी केली. या मागणीची दखल घेत जयंत पाटील यांनी विधिमंडळ सभागृहात हा विषय मांडला. चंद्रपूर जिल्ह्यात दारूबंदी होते तर यवतमाळ जिल्ह्यात का होत नाही, या प्रश्नाचे उत्तर सुधीर मुनगंटीवार देतील. त्यांनी दारूबंदी नाही केली तर आमचे (आघाडी) सरकार आल्यानंतर मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत यवतमाळ जिल्ह्यातील दारूबंदीचा निर्णय घेऊ, असे आश्वासन विधानसभेत जयंत पाटील यांनी या भाषणात दिले होते.

महिलांना दिलेला शब्द खरा करून दाखवा

२०१९ मध्ये सत्तांतर होऊन राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले. जयंत पाटील जलसंपदा मंत्री झाले. मात्र यवतमाळच्या दारूबंदी संदर्भात दिलेल्या आश्वासनाचा त्यांना विसर पडला, तो आजतागायत. आजपर्यंत मंत्रिमंडळाच्या ६७ बैठका झाल्या, मात्र एकाही बैठकीत यवतमाळच्या दारूबंदीची आठवण जयंत पाटील यांना झाली नाही. यवतमाळचे तत्कालीन पालकमंत्री संजय राठोड आता मंत्रिमंडळात नाहीत, मात्र जयंत पाटील यांनी तरी यवतमाळातील असंख्य महिलांना दिलेला शब्द खरा करून दाखवावा, असे आव्हान स्वामिनी दारूबंदी आंदोलनाचे अध्यक्ष महेश पवार यांनी दिले आहे.