दिवसाकाठी साधारण ५५० किलोहून अधिक कचरा जमा

वसई : वसई-विरार, मीरा-भाईंदर आणि पालघर क्षेत्रांत मिळून गेल्या पाच महिन्यांत ५९ हजार ७० किलो जैववैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट लावण्यात आली.

वसई-विरार , मीरा-भाईंदर, पालघर या ठिकाणी रुग्णांवर उपचारादरम्यान कोविड निगा केंद्रात जैववैद्यकीय कचरा तयार झाला होता. या जैववैद्यकीय कचऱ्याच्या निर्मुलनासाठी केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या धर्तीवर राज्य मंडळाने नियमावली तयार केली आहे. त्यानुसार या कचऱ्याची विल्हेवाट लावली जात आहे.

तिन्ही भागातून दिवसाला साधारण ५५० किलोहून अधिक कचरा जमा केला जात आहे. त्यात मीरा-भाईंदर शहरातून सर्वाधिक कचरा निघत आहे. या कचऱ्याची विल्हेवाट लावण्याचे काम पालघर येथील  ‘टच एन ग्लो’ या कंपनीमार्फत केले जात आहे. तिन्ही शहरातून कचरा उचलून त्यावर सोडियम क्लोराईड फवारा मारला जात आहे. यंत्राद्वारे भस्मीकरण केले जात असल्याची माहिती पालघरमधील जैववैद्यकीय कचरा निर्मूलन प्रकल्प व्यवस्थापक नीलेश पाटील यांनी दिली.

पाच टक्क्यांनी घट

जुलैमध्ये करोनाबाधितांच्या संख्येत झपाटय़ाने वाढ झाली होती. त्यामुळे जैविक कचऱ्याचे प्रमाण अधिक होते. दिवसाला सरासरी ६२६ किलो इतका जैविक कचरा तयार होत होता. मात्र, ऑगस्टमध्ये हे प्रमाण पाच टक्क्यांनी घटले आहे. दिवसाला सरासरी ५९० किलो कचरा निघत आहे.

पालिकानिहाय कचरा

एप्रिल ते २५ ऑगस्ट पर्यंत)

* वसई-विरार :  २२ हजार १८ किलो

* मीरा-भाईंदर : ३१ हजार ३९१ किलो

* पालघर :    ५   हजार ४९६ किलो

* एकूण :     ५९ हजार  ७० किलो