आम आदमीच्या नावाने सत्ताकारण करू पाहणाऱ्या आम आदमी पक्षाने प्रत्यक्षात मात्र जागावाटपाच्या बाबतीत काँग्रेसलाही मागे टाकले आहे. पुणे-नागपुरात त्याचा प्रत्यय आला. इच्छुक उमेदवारांची मुलाखत घ्यायची, त्यांनाच उमेदवारी मिळणार याचे संकेत द्यायचे आणि प्रत्यक्षात भलत्यालाच उमेदवारी जाहीर करायची असा धक्कादायक प्रकार ‘आप’च्या बाबतीत उघडकीस आला आहे.
पुण्यातील उमेदवारीसाठी माजी सनदी अधिकारी अरुण भाटिया, बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, पर्यावरणवादी कार्यकर्ते रणजित गाडगीळ, कर्नल सुरेश पाटील आदींची नावे चर्चेत होती. त्यानुसार त्यांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. मात्र, प्रा. सुभाष वारे यांना उमेदवारी जाहीर झाली. त्यामुळे ‘आप’च्या पुण्यातील कार्यकर्त्यांत संभ्रमाबरोबरच नाराजीचेही वातावरण आहे.
दरम्यान, नागपुरातही असाच प्रकार घडला. भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांच्याविरोधात ज्येष्ठ समाजसेविका डॉ. रुपा कुलकर्णी यांनाच उमेदवारी दिली जाणार हे जवळपास निश्चित झाले होते. मात्र, ऐनवेळी त्यांचा पत्ता कापून अंजली दमानिया यांना उमेदवारी देण्यात आली. या प्रकारामुळे संतप्त झालेल्या डॉ. कुलकर्णी यांनी ‘आप’च्या कार्यपद्धतीवरच शंका उपस्थित केली. ‘आप’कडे उमेदवारी मागण्यासाठी मी गेलेली नव्हती. त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते माझ्याकडे दहा-बारा वेळा आले. अनेकदा त्यांनी विनंती आणि आग्रह केला. भाजप आणि काँग्रेसच्या विरोधात आपसारखा पक्ष चांगले काम करतो म्हणून होकार दिला. त्यानंतर त्यांच्या पक्षाच्या नेत्यांचे दूरध्वनीही आले. मात्र, आज दमानियांचे नाव नागपुरातून लढणार असल्याचे म्हणून जाहीर झाल्याने आश्चर्यच वाटले. दमानिया यांचे आधीच ठरले होते तर मला कशाला विचारणा करण्यात आली, असा संतप्त सवाल डॉ. कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे.