करोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील चार महिने जिल्ह्यात टाळेबंदी सुरु आहे. प्रशासनाच्या नियमांना व्यापारी व नागरिकांनी सहकार्य केलेले आहे. परंतू सततच्या बंदमुळे रोजगाराअभावी अनेकांची उपासमार होऊ लागली असून करोनापेक्षा भूकबळी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे ३१ जुलैनंतर टाळेबंदीतून शिथिलता द्यावी अशी मागणी साताऱ्यातील व्यापारी व उद्योजकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाव्दारे केली आहे.

२० मार्चपासून मे अखेरपर्यंत बाजारपेठ बंद ठेवण्यात आली होती. त्यानंतर जिल्ह्यातील अनेक शहरात तालुक्यात रुग्ण आढळून आले. यामुळे त्या त्या भागात प्रतिबंधात्मक क्षेत्र घोषित केल्याने अनेक बाजारपेठा बंद राहिल्या. रुग्ण संख्या वाढू लागल्याने प्रशासनाने पुन्हा १७ ते २६ जुलै जिल्ह्यात टाळेबंदी जाहीर केली. २६ जुलै रोजी त्यात शिथिलता देत फक्त अत्यावश्यक किराणा भुसार, खते, औषधे आदी बाबींची दुकाने सकाळी दहा ते दोन यावेळेत उघडी ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे.

सातारा शहरासह जिल्ह्यातील व्यापाऱ्यांनी यापुढे बाजारपेठा सकाळी नऊ ते पाच या वेळेत उघडाव्यात. वेळेची मर्यादा ठेवल्याने बाजारात गर्दी होत असून त्यामुळे संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे जास्त वेळ बाजारपेठा, बांधकामे, औद्योगिक क्षेत्रे खुली करावीत त्यामुळे गर्दी होणार नाही. सध्या हे सगळे बंद असल्याने दैनंदिन रोजगार असणाऱ्यांची उपासमार होत आहे. व्यापाऱ्यांची उद्योजकांची बँकांची देणी वाढत आहेत. अनेक भागात बॅंका बंद आहेत त्याही खुल्या कराव्यात अशी मागणी करीत सर्व आस्थापना सुरू ठेवण्याबाबत मागणी केली आहे.

वाई शहरात मुख्य बाजारपेठेत व मध्यवस्तीत नागरिक, बँक कर्मचारी करोनाबाधित झाल्याने संपूर्ण शहर महिन्याभरापासून प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. त्यामुळे येथील सर्व व्यवहार ठप्प आहेत. येथील व्यापाऱ्यांनी आमदार मकरंद पाटील, प्रांताधिकारी संगीता राजापूरकर चौगुले, तहसीलदार रणजित भोसले यांना बाजारपेठ खुली करण्यासाठी निवेदन दिले आहे. फलटण येथील व्यापाऱ्यांनीही प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देत दुकाने उघडण्याची मागणी केली आहे.

कराडच्या व्यापाऱ्यांनी वेळ वाढवून मिळण्याची मागणी पृथ्वीराज चव्हाण यांची भेट घेऊन केली आहे. यामुळे आता जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्णयाची प्रतीक्षा आहे. तसेच खासदार उदयनराजे भोसले यांनी देखील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेत टाळेबंदी उठविण्याची मागणी केली. आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना सोबत घेऊन टाळेबंदी उठविण्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली. ३१ जुलै नंतर टाळेबंदी उठविण्यासाठी व्यापाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांवर वेगवेगळ्या मार्गांनी दबाव वाढविण्यास सुरवात केली आहे.

३१ जुलैनंतर व्यवहार सुरु करण्याचा विचार

जिल्ह्यात करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पालकमंत्री तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा करुन २७ पासून पुन्हा टाळेबंदी वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला. सध्या किराणा, भाजीपाला व अत्यावश्यक सेवा सुरु आहेत. तरीही लोक सुरक्षित अंतर पळत नसल्याचे निदर्शनास येत आहे. ३१ जुलैनंतर अत्यावश्यक, आवश्यक व इतर दुकाने सुरु करण्याचा विचार आहे. मात्र, लोकांनी मास्कचा वापर करुन वैयक्तिक अंतर पाळले पाहिजे. हाताची स्वच्छता ठेवली पाहिजे. या तीनच गोष्टी कोरोना संसर्ग रोखू शकतात. आजाराचा प्रसार रोखण्यास या सवयी मदत करु शकतात. मात्र, १ ऑगस्टपासून परिस्थिती पाहून टाळेबंदी उठविण्याबाबत विचार केला जाऊ शकतो, असे साताऱ्याचे जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी म्हटले आहे.