05 March 2021

News Flash

तोडग्याची जबाबदारी डॉ. विकास, डॉ. प्रकाश आमटेंवर

आनंदवनातील दुभंगाबाबत विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय

आनंदवनातील दुभंगाबाबत विश्वस्त मंडळाच्या बैठकीत निर्णय

नागपूर : आनंदवनमधील वादावर डॉ. विकास आणि डॉ. प्रकाश आमटे हे चर्चेतून तोडगा काढतील. तो सर्वाना मान्य असेल, असा निर्णय रविवारी महारोगी सेवा समितीच्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. माध्यमांशी बोलण्याचे अधिकारही यापुढे या दोघांनाच असतील, असेही बैठकीत ठरवण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून आनंदवनमधील वाद चव्हाटय़ावर आले आहेत. कार्यकर्त्यांचा छळ, त्यांच्याबाबत केली जाणारी मनमानी, आरोप-प्रत्यारोप आणि त्यातून उद्भवलेला आमटे कुटुंबीयांतील कलह तसेच कुष्ठरोग्यांना आत्मनिर्भर करणाऱ्या अनेक प्रकल्पांना दिली गेलेली तिलांजली यावर ‘लोकसत्ता’ने सातत्याने प्रकाश टाकला. या पार्श्वभूमीवर रविवारी विश्वस्त मंडळाची वेबबैठक आयोजित करण्यात आली होती. दुपारी ३ वाजता सुरू झालेली ही बैठक सुमारे दोन तास चालली. त्यात वादांच्या सर्व मुद्दय़ांवर सखोल चर्चा झाली. त्यानंतर महारोगी सेवा समितीचे सचिव डॉ. विकास आणि सहसचिव डॉ. प्रकाश आमटे यांनी एकत्र बसून तोडगा काढावा, असे ठरले. येत्या काही दिवसांत डॉ. विकास आमटे हेमलकसा येथे जातील व तेथे हे दोघे चर्चा करून तोडगा काढतील आणि त्यातून बरेच विषय मार्गी लागतील. या दोघांच्या बैठकीत घेतलेले निर्णय विश्वस्त मंडळाला मान्य असतील, असे या वेळी ठरवण्यात आले. ‘लोकसत्ता’तील वृत्तमालिकेच्या पार्श्वभूमीवर आनंदवनसंदर्भात माध्यमे तसेच समाजमाध्यमांत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. हा प्रकार योग्य नाही. त्यामुळे यापुढे आनंदवन परिवाराशी संबंधित कुणीही माध्यमांकडे व्यक्त होणार नाही. समाजमाध्यमांवर सक्रिय राहणार नाही. अधिकृत माहिती देण्याचे अधिकार विकास आणि प्रकाश यांनाच असतील, असेही या बैठकीत ठरवण्यात आले. या निर्णयामुळे सध्याच्या व्यवस्थापनाला धक्का बसला आहे.

आनंदवनमधील राजू सौसागडे व विजय जुमडे हे कार्यकर्ते नाराज आहेत. त्यातून अनेक वाद उद्भवले आहेत. त्यामुळे त्यांना काढून टाकण्यात यावे, अशी मागणी बैठकीत डॉ. शीतल आमटे यांनी केली. त्याला इतरांनी विरोध दर्शवला. आपल्या घरातील माणसे विरोधात का जात आहेत? टोकाची भूमिका का घेत आहेत? यावर सर्वानी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे, असे मत विश्वस्तांनी व्यक्त केले आणि कोणताही कठोर निर्णय घेण्याआधी सखोल चर्चा करावी, असा सल्ला व्यवस्थापनाला दिला. संस्थेतील वाद माध्यमांपर्यंत जाण्यास केवळ एकाच घटकाला जबाबदार ठरवता येणार नाही, अशी भूमिका काहींनी मांडली. कर्मयोगी बाबा आमटे यांनी टीकेकडे कायम दुर्लक्ष केले. त्यांनी झालेली टीका कायम सकारात्मक अंगाने घेतली व झालेल्या टीकेवर ते कधीही व्यक्त झाले नाहीत किंवा त्यांनी त्याचा प्रतिवाद केला नाही. तीच भूमिका घेण्याची गरज आज आहे, यावर विश्वस्तांनी भर दिला. विशेष म्हणजे डॉ. प्रकाश आमटे यांनी शनिवारी ‘लोकसत्ता’ला दिलेल्या मुलाखतीत हेच मत व्यक्त केले होते. बैठकीतही त्यांनी त्याचा पुनरुच्चार केला. माध्यमे त्यांचे काम करतात, आपण आपले काम करायचे व वाद होणार नाहीत याची दक्षता घ्यायची, असेही विश्वस्तांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2020 3:28 am

Web Title: dr vikas and prakash amte get responsibility to resolve disputes in anandvan zws 70
Next Stories
1 गणेशभक्तांसाठी कोकणची वाट खडतरच
2 पीक कर्जवाटपात सहकारी बँकांची आघाडी
3 किनारपट्टी, विदर्भात मुसळधारांचा अंदाज
Just Now!
X