२४ तासात नवीन वीज जोडणी, फिडर व्यवस्थापक नियुक्तीची प्रतीक्षा; वीज ग्राहकांना न्याय मिळणार कसा?

नागपूर : ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी २४ तासात नवीन वीज जोडणी, फिडर व्यवस्थापकाची नियुक्ती, ट्रान्सफार्मर भवन, ग्राम विद्युत व्यवस्थापकाच्या नियुक्तीसह केलेल्या अनेक घोषणा कागदावच आहेत.

राज्यात भाजपची सत्ता आल्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे ऊर्जा खाते आले. त्यांनी आजपर्यंत वेळोवेळी घोषणांचा पाऊस पाडला, परंतु त्या प्रत्यक्षात आल्या नाहीत. ४२ टक्केहून अधिक वीज हानी असलेल्या रोहित्रावर फिडर व्यवस्थापक नियुक्ती केली जाईल, अशी घोषणा त्यांनी केली होती. पथदर्शी प्रयोग म्हणून त्यांच्या कामठी मतदार संघात एक आणि राज्यातील इतर  भागात दोन ठिकाणी या व्यवस्थापकाची नियुक्ती झाली. कामठीला वीज हानी कमी होऊन प्रयोग यशस्वी होत असल्याचे चित्र होते, परंतु महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योजनेतील त्रुटी दूर केल्या नाही. त्यामुळे कंत्राटदाराला विविध कामांचे देयक अदा न झाल्याने त्यांनी काम थांबवले.

दरम्यान, शहरात मागेल त्या ग्राहकाला २४ तासात नवीन वीज जोडणीची घोषणा त्यांनी केली. मात्र, नागपूर जिल्ह्य़ातच एवढय़ा कमी वेळेत जोडणी मिळत नाही. महावितरणच्या काँग्रेसनगर आणि एसएनडीएलच्या आखत्यारितील तीन भागात वीज जोडणीसाठीही काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागते. दोन्ही कंपन्यांचे अधिकारीही नाव न सांगण्याच्या अटीवर संबंधित घरात जुने मीटर आहे काय? त्यावर थकबाकी आहे काय? हे शोधायलाच काही दिवस लागत असल्याने हे शक्य नसल्याचे सांगतात.

ऊर्जामंत्र्यांनी विदर्भ आणि मराठवाडय़ात १० हजार सौरकृषीपंप वाटण्याची घोषणा केली होती. आजपर्यंत साडेआठ हजार पंप देण्यात आले. राज्यात कुठेही रोहित्रामध्ये बिघाड झाल्यास तातडीने दुरुस्तीसाठी ऊर्जामंत्र्यांनी जिल्हा पातळीवर ट्रान्सफार्मर भवनाची घोषणा

केली. त्यामुळे दुरुस्तीचा काळ कमी होऊन ग्राहकांना जास्त काळ अंधारात राहण्याचा प्रश्न निकाली निघणार असल्याचा त्यांचा दावा होता, परंतु अद्याप राज्यत कुठेही या योजनेची अंमलबजावणी नाही. त्यामुळे एजेंसीकडे रोहित्र दुरुस्तीला पाठवले जात आहे. शेतकऱ्यांना सलग १२ तास वीजपुरवठा करण्यात येणार होता. आजच्या घडीला दिवसा आठ तास किंवा रात्री दहा तास अशा चक्राकार पद्धतीने वीज पुरवठा होत आहे.

ऊर्जामंत्र्यांनी एक ग्रामपंचायत एक वीज सेवकाची केलेली घोषणाही कागदावर असून बेरोजगार अभियंत्यांना काम देण्याची संख्याही कमी आहे.

महावितरणची प्रगती

ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात महावितरण वेगाने प्रगती करत आहे. महावितरणकडून ग्राहकांना २४ तासात नवीन वीज जोडणी मिळाली आहे. काही प्रकरणात विलंब होत असेल  तर त्यातील त्रुटी दूर केली जाईल. फिडर व्यवस्थापक, ट्रान्सफार्मर भवन, ग्राम विद्युत व्यवस्थापकाचा प्रश्नही लवकरच सुटणार असून वीज यंत्रणेत मोठा सुधार होईल. बेरोजगार अभियंत्यांनाही काम देण्याचे प्रमाण वाढले असून त्यामुळे अनेकांना रोजगार मिळत आहे.

  – पी. एस. पाटील, मुख्य जनसंपर्क अधिकारी, महावितरण, मुंबई.

विदर्भ व मराठवाडय़ातील उद्योगांना वीज दरात सवलत

ऊर्जामंत्र्यांची सर्वात महत्त्वाची घोषणा विदर्भ आणि मराठवाडय़ातील उद्योगांना वीज दरात सवलतीची होती. शासनाने विशेष अनुदान दिले. विदर्भासाठी नागपूर, कोंकण विभागासाठी कल्याण, पश्चिम महाराष्ट्रासाठी पुणे, मराठवाडय़ासाठी औरंगाबाद ही चार प्रादेशिक कार्यालये सुरू केली. त्यामुळे आता या कार्यालयातूनच निविदा प्रक्रिया होऊन विविध विकास कामांना गती मिळत आहे. गेल्यावर्षी भारनियमनाचे चटके ग्राहकांना बसले असले तरी यंदा ऊर्जामंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे कुठेही भारनियमन झाले नाही.

जिल्हा व तालुका समितींमुळे राजकीय हस्तक्षेप वाढला

ऊर्जामंत्र्यांनी महावितरणच्या कामांवर लक्ष ठेवण्यासाठी  जिल्हा व तालुकास्तरावर समित्या नियुक्त केल्या. यामुळे प्रत्येक कामात राजकीय हस्तक्षेप वाढला असल्याचे अधिकारी सांगतात.