अकरावी आणि बारावीतील अंतर्गत गुणांआधारे मूल्यमापन करण्याचे विचाराधीन
मुंबई : दहावीच्या तीस गुणांच्या अंतर्गत मूल्यमापनाचा पेच शाळांच्या मुख्याध्यापकांना अजूनही पुरता सोडवता आलेला नसताना आता बारावीच्या मूल्यमापनाबाबत नवा गोंधळ सुरू झाला आहे. बारावीचे मूल्यमापनही दहावीच्या सूत्राप्रमाणे करण्याचे नियोजन शिक्षण विभाग करत आहे.
राज्यमंडळाच्या दहावी परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर मूल्यमापनावरून निर्माण झालेला संभ्रम दूर झालेला नाही. नववीचे पन्नास टक्के गुण आणि दहावीच्या वर्षांतील कामगिरीवर आधारित पन्नास टक्के गुण असे निकालसूत्र दहावीसाठी निश्चित करण्यात आले. दहावीच्या गुणांतील पन्नास टक्क्य़ांचे मूल्यमापन कसे करावे असा शाळांसमोरील प्रश्न अद्यापही कायम आहे. आता या निकालगोंधळात बारावीच्या मूल्यमापनाचीही भर पडली आहे. बारावीचे मूल्यांकनही अकरावीचे आणि बारावीच्या वर्षांतील परीक्षांचे गुण मिळून करण्यात येणार आहे. अकरावीच्या गुणांसाठी पन्नास टक्के भारांश आणि बारावीच्या वर्षांतील कामगिरीसाठी पन्नास टक्के भारांश ग्राह्य़ धरण्याचे सूत्र अवलंबिण्याची शक्यता आहे.
प्रत्यक्षिके रखडली..
बारावीच्या विज्ञान शाखेत प्रात्यक्षिकांचे विशेष महत्व आहे. ही प्रात्यक्षिके कनिष्ठ महाविद्यालयांच्या प्रयोगशाळेतच करणे शक्य असते. रसायनशास्त्रासाठी आवश्यक रसायने, भौतिकशास्त्रातील उपकरणे, जीवशास्त्रातील अनेक नमुने घरी उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे अनेक कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये प्रात्यक्षिकांबाबत संभ्रम निर्माण झाला. त्याबाबत राज्यमंडळाचे स्पष्टीकरण आले त्यावेळी करोनाचा प्रादुर्भाव अनेक ठिकाणी वाढला होता. त्यामुळे महाविद्यालयांनी प्रात्यक्षिके घेतलेली नाहीत. आता विद्यार्थ्यांचा शोध घेऊन प्रात्यक्षिके कशी पूर्ण कशी करावी असा प्रश्नही महाविद्यालयांसमोर उभा राहणार आहे.
अकरावीचे विश्रांती वर्ष..
दहावीच्या वर्षांत विद्यार्थ्यांनी स्पर्धात्मक वातावरणात परीक्षेला तोंड दिलेले असते. अकरावीचे वर्ष हे त्यांच्यासाठी सर्वस्वी नवे असते. अभ्यासाची पद्धत, विषय सर्वच बदलते. त्याच्याशी जुळवून घेण्यास विद्यार्थ्यांना वेळ लागतो. बारावीचे वर्ष महत्वाचे आणि वर्षभर मेहनतीचे असल्यामुळे विद्यार्थी अकरावीचे वर्ष हे विश्रांतीचे म्हणूनच गृहित धरतात. दहावी आणि बारावीच्या परीक्षेत अव्वल ठरलेल्या अनेक विद्यार्थ्यांना अकरावीला मात्र कमी गुण मिळाल्याचे दिसते. त्यामुळे अकरावीच्या वर्षांतील गुणांच्या आधारे विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करणे योग्य ठरेल का याबाबत साशंकता आहे, असे मत मुंबईतील एका कनिष्ठ महाविद्यालयाच्या उपप्राचार्यानी व्यक्त केले.
अडचण काय?
गेल्यावर्षी अकरावीच्या वर्षांची अंतिम परीक्षाही अनेक कनिष्ठ महाविद्यालये घेऊ शकली नाहीत. त्याचबरोबर कनिष्ठ महाविद्यालयांतील म्हणजे अकरावीपासून शाखानिहाय शिक्षण असते. त्यातील सर्व शाखांतील सर्व विषयांसाठी प्रात्यक्षिके किंवा तोंडी परीक्षा नसतात. अशा शाखांसाठी बारावीच्या वर्षांतील चाचण्या, प्रकल्प याआधारे गुणांकन करावे लागेल. वर्षभर चाचण्या किंवा प्रकल्प घेऊ न शकलेल्या कनिष्ठ महाविद्यालयांसमोर या गुणांकनाबाबत प्रश्न उभे राहण्याची शक्यता आहे.